बाजारपेठांमध्ये वाढली वर्दळ : खरेदीसाठी उत्साह : आतषबाजी साहित्याकडे मात्र फिरवली पाठ
प्रतिनिधी / पणजी
गणेशचतुर्थी आता केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपली असून राज्यातील बाजारपेठांमध्ये वर्दळ वाढू लागली आहे. भक्तांमध्ये पुन्हा एकदा उत्साह संचारलेला आहे. तथापि, कोरानाचीही भीती वाढलेलीच आहे. या भीतीयुक्त वातावरणातही गणरायाचे स्वागत करण्यासाठी भक्तमंडळींनी जोरात तयारी सुरू केली आहे.
माटोळीचे सामान, खाद्यपदार्थांसाठी लागणाऱया भुसारी सामानाची जमवाजमव सुरू आहे, मात्र सर्वसामान्य जनतेने फटाक्यांकडे साफ दूर्लक्ष केले असून जनतेची मानसिकता बदलत चालल्याने आता यावर्षी राज्यातील बरीचशी घरे फटाक्याविना चतुर्थी साजरी करणार आहे.
शनिवारी गणेशचतुर्थी असल्याने राज्यातील बाजारपेठांमध्ये वर्दळ वाढलीय. कोरोनाच्या वाढत्या साथीमुळे बाप्पाचे स्वागत करण्यासाठी राज्यातील नागरिकांमध्ये मात्र बराच उत्साह संचारलेला आहे. या गंभीर अशा वातावरणात बहुतेकांनी दीड दिवसांचाच गणेशोत्सव करायचे ठरविले आहे. गावागावातील अनेकांनी यावर्षी परंपरा मोडण्याचे ठरविले आहे, मात्र काही गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने 5 व 7 दिवस गणेशोत्सव करण्याचे ठरविले आहे. याचे प्रमाण अत्यल्प आहे.
बाजारांमध्ये माटोळीनिमित्त फळफळावांची आवक वाढलीय. भाजी मोठय़ा प्रमाणात आलीय. याशिवाय गणपतीसमोर आरास करण्यासाठीचे सामान विक्रीसाठी उपलब्ध आहे. व्यापारी वर्गामध्ये मात्र हे सामान विक्रीस जाईल किंवा नाही याची शाश्वती नाही. यंदा फळफळावळ, भाज्यांचे दर वार्षिकपेक्षा बरेच खाली उतरलेले आहेत. जनतेमध्ये उत्साह आहे, परंतु वातावरण भीतीयुक्त आहे. कोणाच्या घरात कधी व कसा कोरोना घुसेल याचा थांगपत्ता लागत नाही. अशा पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी तयारी घरोघरी जोरात सुरू आहे.
फटाक्यांना फाटा
अनेक वर्षांची परंपरा असलेल्या फटाक्यांना यावर्षी फाटा मिळण्याचीच शक्यता वाढलीय. अगोदरच कोरोनाचा वाढता प्रभाव. फटाक्यांच्या धुरामुळे सर्दी पडशे, तसेच श्वासोश्वासाचे आजार बळावण्याची शक्यता जास्त वाढत असल्याने फटाके व इतर दारूसामान खरेदीकडे बालगोपाळ मंडळींनी देखील पाठ फिरवली आहे. अनेक व्यापाऱयांनी सांगितले की, यावर्षी आम्ही फटाके किंवा दारुसामानाच्या वस्तू विक्रीला ठेवणार नाहीत. समाजमाध्यमातून अनेकांनी हा विषयही लावून धरलेला आहे व फटाके किंवा दारुकामाची आतषबाजी करण्याची ही वेळ नाही, असे संदेश एकमेकांना पाठविले जात आहेत.
या साऱया पार्श्वभूमीवर राज्यातील मोठय़ा प्रमाणात नागरिक यावर्षी फटाक्यांच्या तसेच दारुसामानातून प्रदूषण ओढवून घेणार नाहीत. अनेकांनी यावर्षीपासून दारुसामानच नको असा सूर व्यक्त केला. अनेकांनी आम्ही गेली कैकवर्षे दारुसामानाची आतषबाजी व फटाके उडविणे बंद केल्याचे जाहीर केले. या सर्वांचा परिणाम म्हणून यावर्षी दारुसामानाच्या विक्रीच्या प्रमाणात प्रचंड घट निर्माण होईल. सध्या प्रदूषणाचे प्रमाण अत्यंत कमी असून देखील थंडी तापाने आजारी पडणाऱयांचे प्रमाण कमी नाही. त्यातच कोरोनाचा फैलाव प्रचंड वाढत असल्याने फटाक्यातून प्रदूषण ओढवून घेण्याची अनेकांची तयारी नाही. फटाक्यांविना देखील गणेशचतुर्थी मोठय़ा उत्साहात साजरी करता येऊ शकते. अशी आता या निमित्ताने जनतेची मानसिकता तयार झालीय. दरवर्षी दीड, पाच, सात दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर दारुकामातून निर्माण झालेल्या धुरांनी भरलेला असायचा. हे चित्र यवर्षी पहायला मिळणार नाही. कोरोनाची धास्ती अनेकांनी घेतली आणि त्याचबरोबर फटाक्यातून होणाऱया धूरयुक्त प्रदूषणातूनही गोमंतकीय प्रथमच फारकत घेणार आहेत.