कोकण रेल्वे मार्गावर पहिल्याच दिवशी रखडपट्टी
प्रतिनिधी/ खेड
गणरायाच्या आगमनास अवघ्या 5 दिवसांचा कालावधी उरलेला असतानाच खासगी वाहनांसह गणपती स्पेशलमधून चाकरमानी डेरेदाखल होत आहेत. कोकण मार्गावरून धावणाऱया गणपती स्पेशल गाडय़ा 1 ते 2 तास विलंबाने धावत असून पहिल्याच दिवशी गणेशभक्तांना रखडपट्टीला समोर जावे लागले.
गतवर्षी कोरोनाच्या संकटामुळे चाकरमान्यांना गावी येण्यासाठी क्वारंटाईनची सक्ती करण्यात आल्याने साऱयांनीच गावाकडे पाठ फिरवली होती. गतवर्षी गणरायाच्या दर्शनाची हुकलेली संधी भरून काढण्यासाठी गणेशभक्तांनी 4 महिन्यापूर्वीच गावी येण्याचे नियोजन केले. मध्य व कोकण रेल्वे प्रशासनाने एकामागोमाग एक गणपती स्पेशलच्या फेऱया जाहीर करत चाकरमान्यांना सुखद धक्के दिले आहेत. या गणपती स्पेशल 30 सप्टेंबरपर्यंत धावणार असल्याने चाकरमानी बेहद खूष आहेत.
शनिवारपासून कोकण मार्गावर गणपती स्पेशल धावत आहेत. दिवसभरात 25 गणपती स्पेशलमधून चाकरमानी कोकणात दाखल झाले. रविवारीही 50 हून अधिक फेऱयातून गणेशभक्तांनी गाव गाठले. मात्र, कोकण मार्गावर धावणाऱया नियमित गाडय़ांसह गणपती स्पेशलच्या वाढीव गाडय़ांमुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक बिघडले असून पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना विलंबाच्या प्रवासाला समोर जावे लागले.
चार स्पेशल गाडय़ांच्या फेऱया उद्यापासून
कोकण रेल्वे गाडय़ांचे बिघडलेले वेळापत्रक पूर्ववत करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रविवारी दिवा-रत्नागिरी, रत्नागिरी-मडगाव, दिवा-सावंतवाडी, सावंतवाडी-मडगाव या चार स्पेशल गाडय़ांचे आरक्षण खुले झाल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला. या चार स्पेशल गाडय़ांच्या फेऱया 7 सप्टेंबरपासून कोकण मार्गावर धावणार आहेत.









