गणेशभक्तांची गणरायाकडे प्रार्थना
मौजेदापोली/ वार्ताहर
तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त दापोली तालुक्यातील अनेक चित्रशाळांमध्ये आतापासूनच गणेशमूर्ती घडवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. मात्र ‘गणपती बाप्पा तुमचे आगमन होण्याआधी कोरोना संकट जाऊदे,’ अशी विनवणी आतापासूनच गणेशभक्त करताना दिसत आहेत.
कोकणासह सर्वत्र गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र मागीलवर्षी कोरोनाचे संकट आल्याने हा सण घरच्या घरी साजरा करण्यात आला तर यावर्षीही मागील पद्धतीने हा उत्सव साजरा करावा लागणार असल्याचे वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे दिसत आहे. 10 सप्टेंबर रोजी गणेशोत्सव असून यादिवशी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळे दापोलीतील अनेक गणेश चित्रशाळांमध्ये गणपतीच्या मूर्तींना आकार देण्याचे काम मूर्तीकारांनी सुरू केले आहे, मात्र या कामांमध्येही लॉकडाऊन व इतर गोष्टींचा अडथळा निर्माण होत आहे. अनेक मूर्तीशाळांमध्ये अजूनही मातीची प्रतीक्षा लागली आहे.

गणेशाची मूर्ती तयार झाल्यानंतर मूर्तीला पॉलिश करणे, रंग देणे अशी अनेक बारीकसारीक कामे असतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काही महिने आधीच गणेशमूर्ती घडवण्याचे काम हाती घ्यावे लागते. दापोली तालुक्यातील काही गावांमध्ये परजिल्हय़ातून गणेशमूर्ती आणल्या जातात व त्यानंतर त्यांना रंग दिला जातो तर काही ठिकाणी पूर्ण तयारच मूर्ती आणल्या जातात.
2 महिन्यात गणेशमूर्तींचे काम होईल पूर्ण
दापोली बाजारपेठेतील श्री गजगणेश चित्रशाळेत मूर्ती बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक मूर्ती घडवण्यात आल्या असून उर्वरित कामे सुरू आहेत. येत्या 2 महिन्यांत गणेशभक्तांसाठी गणेशमूर्ती सज्ज असतील, असे मूर्तीकारांनी ‘तरूण भारत’ला सांगितले.
गणपती बाप्पाच्या आगमनाआधी कोरोना जाऊदे!
2020 मध्ये कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने मोठय़ा थाटात साजरा होणारा गणेशोत्सव घरच्या घरी साजरा करण्यात आला. त्यामुळे गणपती बाप्पा तुमचे आगमन होण्याआधी कोरोना संकट जाऊदे, अशी विनवणी आतापासूनच गणेशभक्त करत आहेत. परंतु कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे यावर्षीही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागण्याची शक्यता गणेशभक्त वर्तवत आहेत.









