जीवरक्षकांसह व्यापाऱयांमुळे वाचले तरूणांचे जीव
वार्ताहर/ गणपतीपुळे
कोल्हापूर येथून गणपतीपुळेत फिरण्यासाठी आलेल्या 5 तरूणांना येथील समुद्रात बुडताना वाचवण्यात येथील जीवरक्षक तसेच समुद्र चौपाटीवरील व्यापाऱयांना यश आले. ही घटना मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली. यातील एकाची प्रकृती बिघडल्याने त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हर्षद बाजीराव कांबळे (20, रा. कोल्हापूर), सौरभ उत्तम खोत (21, रा. देववाडी, ता. बत्तीसशिराळा), ओंकार ईश्वरा पाटील (19, रा. झुंगूर, कोल्हापूर), कृष्णा तुकाराम पाटील, सुरज धनाजी कदम (20, रा. बांबवडे-कोल्हापूर) अशी या घटनेत वाचलेल्या तरूणांची नावे आहेत. यातील सुरज धनाजी कदम याची प्रकृती बिघडल्याने देवस्थानच्या रूग्णवाहिकेने जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच त्यांच्यासोबत अतुल शामराव खोत, केतन संभाजी परीट व चालक नितीन पाटील हे होते.
गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र तसेच अन्य ठिकाणांहून येथे पर्यटक मोठय़ा संख्येने दाखल होवू लागले आहेत. मात्र त्यांच्या वावराबाबत संताप व्यक्त होत आहे. अशातच कोल्हापुरातून सकाळी 9 च्या दरम्यान बोलेरो गाडीतून 8 तरूण आले. या 8 तरूणांपैकी पाच तरूण दुपारी 12 च्या दरम्यान आंघोळीसाठी गणपतीपुळे समुद्रात उतरले. यावेळी त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले. जीव वाचवण्यासाठी त्यांनी केलेल्या आरडाओरडय़ानंतर लगेचच समुद्रचौपाटीवरील व्यापारी व जीवरक्षक सतर्क झाले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता समुद्रात उडी घेतली आणि समुद्रात रिंग, बोये व दोरीच्या सहाय्याने बुडणाऱया या पाच तरूणांना समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढले.
जीवरक्षकांसह पोलिसांची मोलाची कामगिरी
या कामी येथील जीवरक्षक आशिष माने, अनिकेत राजवाडकर, अक्षय माने, विक्रम राजवाडकर, विशाल निगडे, सुयोग पाटील, विरेन सुर्वे व व्यापारी तसेच पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील, पोलीस अंमलदार मधुकर सरगर, पोलीस शिपाई प्रशांत लोहाळकर, गिरी घोसावी यांनी मोलाची कामगिरी बजावली.
पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
गणपतीपुळे समुद्राला अनेक ठिकाणी चाळ निर्माण झाले असून असे पर्यटक बुडण्याचे प्रकार वारंवार घडण्याची शक्यता येथील व्यावसायिकांनी व्यक्त केली. त्यामुळे या तीर्थक्षेत्रात देवदर्शनासाठी आलेल्या पर्यटकांनी योग्य ती काळजी व खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









