शिरोळ / प्रतिनिधी
श्री दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जमिनीच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे. ज्या जमिनी क्षारयुक्त अथवा पडीक होत्या, अशा जमिनीमध्ये सुधारणा करण्याचे काम त्यांनी हातात घेतले आहे. काही योजनांना भेटी दिल्या. अनेक जमिनी पुन्हा पिकाखाली येत आहेत. तसेच जमिनिंची अतिशय चांगली सुधारणा झाल्याचे दिसून आले. दत्त कारखान्याच्या वतीने चांगले काम होत असून हे काम पाहून मनापासून समाधान वाटले, असे मनोगत राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
श्री दत्त कारखान्याच्या वतीने शिरोळ आणि परिसरातील १८ गावामध्ये क्षारपड जमीन सुधारणा योजनेचे काम सुरू आहे. शिरोळ, घालवाड, अर्जुनवाड या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली, यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाचे काम कशा पद्धतीने सुरू आहे हे त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहिले. त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चाही केली. ज्या जमिनीमध्ये २५ ते ३० वर्षापासून काहीच पीकत नव्हते तेथे आता या सुधारणा योजनेच्या प्रकल्पामुळे प्रत्यक्षात पिकांचे उत्पादन घेत असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.
दत्त कारखाना कार्यस्थळालाही त्यांनी भेट दिली. कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी मंत्री जयंत पाटील यांचे स्वागत केले. त्यानंतर प्रोजेक्टरच्या माध्यमातून क्षारपड जमीन योजनेची संपूर्ण माहिती आणि आढावा मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांनी सादर केले केला. यानंतर मंत्री पाटील यांनी शेडशाळ, शिरोळ, घालवाड, बुबनाळ, अर्जुनवाड आदी भागातून योजनेतील सहभागी शेतकरी यांच्याबरोबरही चर्चा करून माहिती जाणून घेतली. चेअरमन गणपतराव पाटील तसेच कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी योजनेची माहिती दिली.
कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादकांसाठी प्रकाशित केलेल्या ‘शाश्वत ऊस शेतीचा दत्त पॅटर्न’ या पुस्तिकेचे प्रकाशन मंत्री जयंत पाटील यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. कॉन्ट्रॅक्टर किर्तीवर्धन मरजे व सुदर्शन तकडे यांनी प्रत्यक्षात काम कसे केले जाते याची माहिती सांगितली.
यावेळी शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, दरगू गावडे, अशोकराव कोळेकर, धनाजी पाटील नरदेकर, भैय्यासाहेब पाटील, महेंद्र बागी, वरूण पाटील, प्रमोद पाटील, कारखान्याचे सचिव अशोक शिंदे, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, ए. एस. पाटील, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले, शक्तीजीत गुरव, संजय चव्हाण, विजयकुमार गाताडे, सुभाष शहापुरे, मफत पाटील, गुरुदत्त देसाई, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
Previous Articleपवित्र रिश्ता टू मध्ये सुशांतच्या जागी कोण येणार?
Next Article लसीकरणामुळे मालामाल









