नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिलखुलास शैलीसाठी ओळखले जाणाऱया केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. ‘यूटय़ूब’कडून आपल्याला दरमहा चार लाख रुपये मिळत असल्याची कबुली त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान दिली. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे व्याख्याने देण्यास सुरुवात केल्यापासून आपले व्हिवर्स मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे हे उत्पन्न आपल्याला सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले. गडकरी यांचे सध्या यूटय़ूबवर 1 लाख 97 हजार इतके फॉलोवर्स आहेत.
कोरोना काळापासून आपला सोशल मीडियाकडे ओढा वाढला असून स्वयंपाक बनवणे आणि ऑनलाईन व्याख्याने देणे या दोन गोष्टी नव्याने अवगत केल्याचे स्पष्टीकरण गडकरी यांनी दिले आहे. मी अनेक व्याख्याने ऑनलाईन दिली असून ती यूटय़ूबवरही अपलोड केली गेली. साहजिकच चाहत्यांच्या प्रचंड संख्येमुळे, यूटय़ूब आता मला दरमहा 4 लाख रुपये देते, असे गडकरी यांनी भाषणात बोलता-बोलता सांगितले.
सोशल मीडियाच्या युगात जवळपास प्रत्येकजण यूटय़ूबशी परिचित आहे. सेलिब्रिटीपासून ते सामान्य लोकांपर्यंत यूटय़ूबच्या माध्यमातून लाखो रुपये कमावतात. परंतु राजकारण्यांबद्दल अधिक चर्चा होत नाही. मात्र, गडकरी यांनी यूटय़ूबकडून आपल्याला मिळत असलेले मासिक उत्पन्न जाहीर करून यूटय़ूबप्रेमींसह सर्वांनाचा सुखद धक्का दिला आहे.









