साहित्यिक – कलावंतांची मागणी, स्मृती दिनानिमित्त प्रतिमेची पूजा
पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्राचे शेक्सपिअर शब्दप्रभू कै. राम गणेश गडकरी यांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त संभाजी उद्यान येथील मुख्य दरवाज्याजवळ त्यांच्या प्रतिमेची व साहित्याची गुरुवारी पूजा करण्यात आली. कोथरुड नाटय़ परिषदेच्या वतीने त्यानिमित्त स्मरणसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी साहित्यिक आणि कलावंतांनी गडकरींचा लवकरात लवकर पुतळा बसवावा, अशी मागणी केली.
कै. गोविंदाग्रज यांच्या निवडक सहा कविता व रामगणेशाय नमः या पुस्तकांचे पूजन करण्यात आले. यावेळीस लेखक-नाटय़ कलावंत श्रीराम रानडे म्हणाले, गडकरी यांना मला वंदन करायला मिळते, हे अभिमानास्पद आहे. अभिनेते विजय गोखले म्हणाले, गडकरींच्या शताब्दीनिमित्त त्यांच्या ‘एकच प्याला’ या संगीत नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने युवा पिढीला गडकरींची ओळख करून द्यायची संधी मिळाली, याचा मला अभिमान आहे.
योगेश सोमण म्हणाले, तीन वर्षापूर्वी ज्या समाजकंटकांनी हा पुतळा तोडला त्याचा आम्ही निषेध करतो व पुतळा बसविण्यासाठी रंगकर्मीतर्फे आंदोलन करु आणि पुतळा पुन्हा उभा राहीपर्यंत संघर्ष करू.
मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी म्हणाले, भाषाप्रभू गडकरी हे मराठीचे वैभव आहे. गडकरींचा पुतळा पुन्हा उभा करू, असे आश्वासन पुण्याच्या कारभाऱयांनी दिले होते. त्याचे पालन करून पुतळा लवकरात लवकर उभा करावा. कोथरुड परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी प्रस्ताविक व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. यानिमित्ताने दादोजी कोंडदेव व राम गणेश गडकरी यांचे पुतळे त्वरित बसवले जावेत, यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांना सर्व रंगकर्मीच्या वतीने भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.









