केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सांगितलेल्या समजुतीच्या चार गोष्टी म्हणजे योग्य वेळी दिलेला ’डोस’च म्हणायला हवा. कार्यक्षमता, वेगळी दृष्टी नि विकासाधारित राजकारणासाठी प्रसिद्ध असलेले गडकरी हे भारतीय राजकारणात स्पष्टवक्ते नेते म्हणूनही ओळखले जातात. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविलेल्या गडकरींनी आजवर प्रत्येक जबाबदारी ही नेटाने पार पाडली आहे. त्यामुळे त्यांनी अधिकारवाणीने दिलेला सल्ला भाजपा कार्यकर्त्यांनी गांभीर्याने घेतला पाहिजे. कोणत्याही कामाचे श्रेय आपल्याला, आपल्या पक्षाला मिळावे, असे कुणालाही वाटणे तसे स्वाभाविक. परंतु, आज देशातील स्थिती वेगळी आहे. कोरोनाच्या विळख्यात अडकल्याने येथील जनजीवनाचा पूर्णपणे कोंडमारा झालेला पहायला मिळतो. आजवर हजारो लोकांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स वा योग्य उपचाराअभावी प्राण गमवावे लागले आहेत. त्यात बेरोजगारी, आर्थिक विपन्नावस्था, वाढती महागाई याने जगणे अधिक कठीण बनले आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मजबूत सरकार असले, तरी आरोग्य व आर्थिक संकटात हे सरकार कमी पडले, ही वस्तुस्थिती आहे. अशा काळात पक्षाकडून काही सेवाकामे होत असतील, तर ती स्तुत्यच. तथापि, ही कामे, त्याचे स्वरूप नि त्यावरील बॅनरबाजी, फोटोसेशन किती असावे, याचे काहीतरी तारतम्य बाळगायला हवे. त्यात कोरोनाविषयक नियमांनाही फाटा दिला जात असेल, तर ते अधिकच गंभीर. त्या अर्थी गडकरींचा सल्ला महत्त्वपूर्ण ठरतो. आपण केलेले काम लोकांना माहीत होणे, इथवर त्याचा प्रचार करणे ठीक आहे. त्याचा फार बागुलबुवा नको, असे ते म्हणतात. भाजपा व सोशल मीडिया हे अलीकडे निर्माण झालेले समीकरण. त्यातून सवंगपणा, प्रसिद्धीचे ढोल, गवगवा अशा आयटी सेल केंद्रित कार्यक्रमांवर अधिक भर दिला जातो. प्रत्यक्षात काळ-वेळेचे भान न राखता सतत असा रतीब घालणे तिडीक आणणारे असते. पक्षाच्या अशा बागुलबुवाबाजीला व फुगे फुगविण्याला लोक खरेच कंटाळले आहेत. गडकरी यांनी ते ओळखून दिलेल्या कानपिचक्मया म्हणजे त्यांच्यासारखा नेता लोकजाणिवेचा किती बारकाईने अभ्यास करतो, हेच दर्शविते. त्यांनी सांगितलेला राजकारणाचा अर्थही केंद्र, राज्यातील राजकीय कुरघोडय़ा करण्यात दंगलेल्या नेत्यांनी समजून घ्यायला हवा. समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण म्हणजे राजकारण. नुसत्या निवडणुका लढवणे, सत्तेत जाणे म्हणजे राजकारण नाही. ही त्यांची व्याख्या त्यांच्या पक्षातील निवडणूक बहाद्दर व करेक्ट कार्यक्रमासाठी आसुसलेल्या नेत्यांना कधी कळेल, देव जाणे. परंतु दौरे करताना गाडीत किती लोक आहेत, उद्घाटने वा कार्यक्रम व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही करता येऊ शकतात, इतका समंजसपणा ते दाखवतील, अशी आशा करायला वाव आहे. वास्तविक, कोरोना काळात सर्वच पक्षांनी अनेक नेते, कार्यकर्ते गमावले आहेत. हे नुकसान तसे कधीही भरून न येणारे. म्हणूनच स्वतःबरोबरच या कार्यकर्त्यांना जपणे, ही नेतृत्वाची जबाबदारी होय. याबाबत प्रत्येक नेत्याने गडकरी यांच्याप्रमाणे संवेदनशीलता दाखविली, तर ते परिपक्वतेचे लक्षण मानता येईल. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस निश्चितच हुशार राजकारणी आहेत. मात्र, नकारात्मक सूर व आक्रस्ताळेपणामुळे त्यांची अभ्यासू व धोरणी नेता, ही प्रतिमा धूसर होते की काय, अशी आता भीती वाटते. सत्ता येते, जाते, त्याचे अति दुःख वाटून घेऊन द्वेषमूलक राजकारण करणे, शोभादायी नाही. फडणवीस यांच्याकडे वेगळी दृष्टी नक्कीच आहे. गरज आहे, ती संयमाची व सारासार विवेकाची. हे पाहता त्यांनी गडकरींकडून विकासाधारित व प्रगल्भ राजकारण शिकणे अपेक्षित आहे. गडकरी हे सद्सद्विवेकबुद्धीने चालणारे अटलबिहारी वाजपेयी यांच्या परंपरेतील सर्वसमावेशक नेते आहेत. त्यांच्या खात्यातील कामांवर नुसती नजर टाकली, तरी त्यांचा विलक्षण झपाटा ध्यानात येतो. मूळ म्हणजे त्यांचे कामच बोलते. याकरिता निव्वळ बोलभांडपणा सोडून गडकरींच्या समृद्ध मार्गाने कसे जाता येईल, याकडे विशेषतः महाराष्ट्रातील नेत्यांनी लक्ष द्यावे. ते त्यांच्या भवितव्याकरिता अधिक उपकारक ठरेल. दुसरीकडे कोरोना महामारीत पंतप्रधान कार्यालय साफ अपयशी ठरल्याने या संकट विरोधी लढय़ाचे नेतृत्व गडकरी यांच्याकडे सोपविण्याची मागणी भाजपाचे ज्ये÷ नेते व राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. गडकरी हेच खरे कामाचे आहेत, असेच स्वामी यांना यातून सुचवायचे नाही ना, असा प्रश्न यातून पडतो. खरे तर स्वामी हे सातत्याने काहीतरी वादग्रस्त विधाने करीत असतात. एरवी त्यांना कुणीही गांभीर्याने घेत नाही. तरी या खेपेला नेमके टायमिंग साधून त्यांनी गडकरी यांचे नाव पुढे केल्याने त्यांचे विधान सकारात्मकरीत्या चर्चिले गेले, हे लक्षात घेतले पाहिजे. गडकरी यांना मोदी व शहा यांच्याकडून डावलले जात असल्याची एक प्रबळ भावना लोकमानसात आहे. ही पार्श्वभूमीदेखील त्यामागे असावी. काही असो. हा कालखंड अतिशय कठीण म्हणूनच राजकारणापलीकडे जाण्याचा आहे. त्याकरिता पक्षांतर्गत वा पक्षा-पक्षातील मतभेद टाळावेच लागतील. कोरोनाच्या दुसऱया लाटेचे तडाखे बसत असताना तिसऱया लाटेची शक्मयताही वर्तविण्यात आली आहे. ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगितले जाते. हे आव्हान पेलण्याकरिता सत्ताधारी, विरोधक व जनता या तिघांना समन्वयाची भूमिका घ्यावी लागेल. समाजकारण, राष्ट्रकारण नि विकासकारण ही गडकरी यांनी सांगितलेली त्रिसूत्री त्याकरिता उपयुक्त ठरू शकेल, यात संदेह नाही.
Previous Articleश्रद्धा आणि कोरोना
Next Article भाडेकरूंना आता ‘आधार’चा पत्ता बदलता येणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








