शहरातील संपूर्ण गटारी कचऱयाने तुंबलेल्या : कांही नागरिकांकडून पुन्हा गटारीतच कचरा टाकण्याचा प्रकार
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील कचऱयाची उचल करण्याबरोबर गटारींची स्वच्छता करण्याची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाची आहे. मात्र, या जबाबदारीकडे मनपाच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शहरातील संपूर्ण गटारी कचऱयाने तुंबल्या आहेत. परिणामी सांडपाण्याचा निचरा होण्यास अडचण निर्माण होऊन परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
कचऱयाची उचल करण्यासाठी महापालिका प्रशासन कोटय़वधी निधी खर्ची घालते. कचऱयाची उचल करण्याबरोबरच गटारी स्वच्छ करण्यासाठी वर्षाला 25 कोटी निधी खर्च केला जातो. मात्र, महापालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार केवळ कचऱयाची उचल करीत आहेत. गटारी स्वच्छ करण्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. त्यामुळे गटारी तुंबण्याचे प्रकार वाढले आहेत. प्रत्येक परिसरातील गटारी स्वच्छ करण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. बाजारपेठेतील गटारी दर चार दिवसांनी स्वच्छ करण्याची अट स्वच्छता कंत्राटदारांना घालण्यात आली आहे. मात्र, गटारी स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करण्यात येते. तरीही काही नागरिक गटारीमध्ये कचरा टाकत आहेत. याचा फटका परिसरातील नागरिकांना बसत आहे.
सध्या शहराच्या विविध भागातील गटारी कचऱयाने भरल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी दुर्गंधी पसरत आहे. वास्तविक पाहता गटारी स्वच्छ करवून घेण्याची जबाबदारी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक, पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांची आहे. मात्र, याकडे अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. अधिकाऱयांच्या बेजबाबदारपणामुळे कंत्राटदारांचे फावत आहे. स्वच्छता कंत्राटदारांना बिलाची रक्कम देण्यात येते. पण गटारी स्वच्छ न करताच बिल वसूल करण्याचा सपाटा कंत्राटदारांनी चालविला आहे. त्यामुळे महापालिकेच्या निधीचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. गटारींच्या अस्वच्छतेमुळे सांडपाणी साचून काही ठिकाणी जलवाहिन्यांमध्ये पाझरत आहे. काही भागातील कूपनलिका आणि विहिरींमध्ये सांडपाणी पाझरत असल्याने पाणी दूषित झाले आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱयांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे.
कंत्राटदाराची रक्कम वजा करा
नार्वेकर गल्ली परिसरातील गटारी गेल्या महिन्यापासून स्वच्छ करण्यात आल्या नाहीत. गटारी स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक आणि कंत्राटदाराला सूचना करूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. गटारी स्वच्छ करण्यासाठी दर आठ दिवसांतून एकदा स्वच्छता निरीक्षक आणि मुकादमाला फोन करून तक्रार करावी लागत आहे. तरीही गटारी स्वच्छ केल्या जात नाहीत. नागरिकांनी फोन करून सूचना केल्यानंतरही मनपाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मनपाच्या स्वच्छता निरीक्षकांची जबाबदारी काय? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. महापालिकेच्या आयुक्तांनी व पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी याबाबत पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, तसेच गटारी स्वच्छ करण्याची रक्कम कंत्राटदारांच्या बिलातून महापालिकेने वजा करून घ्यावी, अशी मागणी होत आहे.