मुक्या प्राण्याला वाचविण्यासाठी मुख्याधिकारी यांनी प्रशासनामार्फत केले सहकार्य
तब्बल 12 तास गटारांत अडकून पडली होती म्हैस
वेंगुर्ले / वार्ताहर-
रेडी-रेवस महामार्गावरील उभादांडा ग्रामपंचायत क्षेत्रात मानसीश्वर पेट्रोल पंप व डॉ मोरे हॉस्पीटल दरम्यान तब्बल 12 तास उभादांडा येथील नरसुले यांची अडकून पडलेली म्हैस वेंगुर्ले नगरपरीषदेच्या जे.सी.बी. च्या साहय्याने स्थानिक उभादांडा बागायतवाडी व सिध्देश्वरवाडीतील ग्रामस्थांच्या रेस्कू पथकाने अथक प्रयत्न करून बाहेर काढत जिवदान दिले. नगरपरीषदेने आपल्या हद्दीचा प्रश्न निर्माण न करता मुक्य प्राण्यास जिवदान दिल्याबद्दल उभादांडा ग्रामस्थांनी त्यांचेसह नगरपरीषदेचे आभार व्यक्त केले.
उभादांडा मार्गावरील डॉ. मोरे हॉस्पीटल व मानसीश्वर पेट्रोलपंप दरम्यानच्या गटारांत सोमवारी रात्रौ 10 वाजण्याच्या सुमारांस अडकून पडली होती. सर म्हैशीचे मालक श्री. नरसुले हे शोधाशोध करीत होते. आज मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारांस मानसीश्व र पेट्रोलपंपाच्या ठिकाणी आपल्या गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी ती म्हैस दिसली. ती गटारांत फिट्ट बसल्याने तिला काढता येणे सहज शक्य नसल्याने त्यांनी तात्काळ वेंगुर्ले नगरपरीषदेच मुख्याधिकारी डॉ अमितकुमार सोंडगे यांनी संपर्क साधत मुक्या प्राणाला वाचविण्यासाठी नगरपरीषदेमार्फत जे.सी.बी पाठवून सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानुसार नगरपरीषदेचे कर्मचारी हेमंत चव्हाण व शशांक जाधव हे तात्काळ जे.सी.बी.सह घटनास्थळी आले. उभादांडा बागायतवाडी व सिध्देश्वरवाडी ग्रामस्थांचे सहकार्य घेत रेस्कू ऑपरेशन करीत सकाळी 11 वाजण्याच्या सुमारांस गटारांतून त्या म्हैशीस सुखरूप काढण्यांत आले. त्यावेळी उभादांडा ग्रामस्थांनी मुख्याधिकारी. कर्मचारी यांसह नगरपरीषदेचे आभार मानले.