प्रतिनिधी / असळज
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची सांख्य वाढतच आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यांनतर कामानिमित्त पुण्या-मुंबईला असणारे लोक जिल्ह्यात परत येत असल्याने त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढत आहे. त्यातच आज बुधवार दि. २० रोजी सकाळी अणदूर (ता.गगनबावडा) येथील एका रूग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तो मुंबईवरून गावी आलेला होता. सध्या तो गावातील शाळेत क्वारंटाईन आहे.
गगनबावडा तालुक्यात अखेर कोरोनाने प्रवेश केला. तालुक्यातील अंदूर येथे मुंबईवरून आलेली ही व्यक्ती पॉझिटिव्ह निघाली असून सध्या ती गावातील शाळेत क्वारंटाईन आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कोल्हापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यास प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या असून त्यांच्यासोबत असणाऱ्या आणखी काही क्वारंटाईन्सला देखील हलवले जाणार आहे. तालुक्यात पहिलाच कोरोनाबाधित आढळल्य़ाने खळबळ उडाली आहे.
सध्या गगनबावडा तालुक्यात देखील कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. तालुक्याच्या ठिकाणी असणारी समाजकल्याण विभागाची वस्तीगृह इमारत आता कोरोना केअर सेंटर म्हणून वापरण्यात येणार आहे. त्यासाठीचे नियोजन प्रशासनाने पूर्ण केले आहे. या रुग्णालयात १०० बेडची सुविधा उपलब्ध होणार असून सध्या ४६ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी तालूक्यातील आवश्यक ते वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. या रुग्णालयात येत्या स्वॅब घेण्याची व्यवस्थाही सुरु करण्यात येणार असून स्वॅब घेवून तो पुढील तपासणीसाठी कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयाकडे पाठविणेत येणार आहे.
गगनबावडा तालूक्यात मुंबईवरून आलेली ही व्यक्ती कोरोनाची पहिली पॉझिटिव्ह निघाल्याने त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. स्वॅब घेण्यापासून ते क्वारंटाईन करुन ठेवण्यासाठी गगनबावडा येथे आवश्यक ती सोय उपलब्ध करुन ठेवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसापासून मुंबई-पुणे तसेच इतर जिल्ह्यातून अनेक लोक गावाकडे येत असल्याने दक्षता घेण्यात येत आहे. गगनबावडा चेक पोस्टवर काटेकोरपणे वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. गावात बाहेरुन येणा-या लोकांवर नजर ठेवून त्याना होम क्वारंटाईन व इन्स्टीट्यूशन क्वारंटाईन करण्यात येत आहे. गगनबावडा पंचायत समिती विभाग गटविकास अधिकारी महेश सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गगनबावडा तालूक्यात प्रशासन सज्ज असल्याची माहिती यानिमित्ताने तहसिलदार डॉ.संगमेश कोडे यांनी दिलीय.