प्रतिनिधी/ गगनबावडा
गेल्या आठवड्यापासून गगनबावडा तालुक्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. शनिवार, रविवार या दोन सुट्टीच्या दिवशी तर सर्वच पर्यटनस्थळे हाऊसफूल्ल होतात. गगनबावडा पोलीस विभागाच्यावतीने हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना चांगलाच प्रसाद दिला आहे. त्यातील काहीजणांनी आपण फार्महाऊसवर आल्याचे सांगितले. सर्वच ग्रामपंचायतीनी आपल्या हद्दीतील फार्महाऊसची माहिती देण्याचे आदेश तहसिलदार संगमेश कोडे यांनी दिले आहेत. स्थानिक जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या पर्यटकांना आवर घालण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केल्याने पर्यटकांना काही नियम पाळावे लागणार आहेत.
संचारबंदी शिथिल केल्याच्या पार्श्वभूमीवर पावसाळी पर्यटनासाठी शहरवासियांनी गगनबावडा तालुक्यात शिरकाव केला आहे. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामिण भागात भितीचे वातावरण आहे. अशातच ठिकठिकाणी गर्दी वाढली आहे. संगीताच्या तालावर नाचकाम करणे, दारु पिऊन धिंगाणा घालणे, कचरा टाकणे यामूळे स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रविवारी तर लोकांनी केलेल्या तक्रारीमूळे पोलिसांनी काठी, लाठी द्वारे गर्दी पांगवली. यातील काहीजणांनी आपल्या फार्महाऊसवर आल्याचे सांगितले. त्यामूळे येथील फार्महाऊसची चौकशी होणार आहे.








