वार्ताहर / साळवण
गगनबावडा तालुक्यात साळवण, असळज, तिसंगी गावासह तालुक्यातील अनेक छोटी मोठी गावे या ठिकाणी सुरु असणारे अवैध व्यवसाय तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी गगनबावडा तालुका विकास कृती समितीच्या वतीने गगनबावडा तहसिलदार डॉ. संगमेश कोडे यांना निवेदन देण्यात आले.
गगनबावडा तालुका विकास कृती समितीने गगनबावडा येथील स्वातंत्र्यसेनानी अच्यूत नानीवडेकर यांच्या स्मारकास अभिवादन करुन गगनबावडा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या स्वप्नपूर्तीसाठी गगनबावडा तालुका विकास कृती समितीच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली व तालुक्याच्या विकासाला खिळ घालणाऱ्या अवैध व्यवसायाला पायबंद घालण्यासाठी पहिल्या टप्प्यात तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करण्याच्या मागणीचे निवेदन देऊन व एम.जी.पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गगनबावडा तालुका विकास कृती समितीच्या कार्याचा शुभारंभ करण्यात आला.
गगनबावडा पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यसेनानी शहीद अच्युत नानीवडेकर यांच्या स्मारकास पूष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
गगनबावडा तालुक्यात अवैध व्यवसायांचे साम्राज्य वाढले असून तालुक्यात अवैधरित्या दारूची राजरोसपणे विक्री केली जात आहे,तालुक्यातील प्रमूख बाजारपेठासह अनेक गावात मोठ्या प्रमाणात दारुची बेकायदेशीर विक्री होत असून यामुळे अनेकांचे संसार उध्दवस्त होत आहेत. अवैधरित्या सहज उपलब्ध होणाऱ्या दारुच्या आहारी अनेक तरुण जात असल्यामुळे या बेकायदेशीर दारु विक्रीमुळे अनेक तरुणांचे भवितव्य दावणीला लागले आहे. त्याच बरोबर तालुक्यात जुगार अड्डे यांचेही प्रमाण वाढले आहे, तसेच गगनबावडा तालुक्यात खाजगी सावकारी व्यवसाय वाढत जात असून या व्यवसायाच्या जाळ्यात अडकलेल्या व ज्यांचे संसार उद्धवस्त झालेल्या अनेकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याच्या घटना घडल्या आहेत.
या अवैध व्यवसायामुळे तालुक्यातील विकासाला बाधा पोहचत असून अवैध धंदाच्यावर तात्काळ कारवाई करून असे व्यवसाय करणाऱ्यांवर गून्हे दाखल करावेत अन्यथा मंगळवार १५ सप्टेंबर रोजी या अवैध व्यवसायाविरोधात साळवण येथे रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. तहसिलदार डॉ.संगमेश कोडे यांनी गगनबावडा तालुका विकास कृती समितीच्या वतीने अवैध व्यवसाय बंद करण्याच्या मागणीसाठी देण्यात आलेले निवेदन स्वीकारले.
अवैध व्यवसाय बंद करण्याच्या मागणीचे निवेदन देते प्रसंगी गगनबावडा तालुका विकास कृती समितीचे बंकट थोडगे,एम.जी.पाटील,विनोद प्रभूलकर,संदिप पाटील,शाहूराज काटे,सर्जेराव खाडे,गिरीश प्रभूलकर,सूनिल गूरव,बाळासाहेब गूरव,विजय टक्के,गणेश पाटील आदी उपस्थित होते.
Previous Articleऑगस्टमध्ये चीनची निर्यात 9.5 टक्क्यांनी वाढली
Next Article सौदी अरबने तेलाच्या किमती घटविल्या









