गौतम गंभीर व महेंद्रसिंग धोनी यांच्यातील विळय़ाभोपळय़ाचे सख्य सर्वश्रुत आहे. स्वतः धोनीने जाहीर मतभेदाला तोंड फुटेल, अशी वक्तव्ये टाळण्याचे पथ्य कटाक्षाने पाळले असले तरी दुसरीकडे, गंभीरने मात्र संधी मिळेल त्यावेळी धोनीवर जोरदार टीका केली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध 217 धावांचा डोंगर सर करायचा असताना धोनीने नवख्या खेळाडूंना पुढे फलंदाजीला पाठवत स्वतः सातव्या स्थानी उतरण्याचा निर्णय घेतला, यावर गंभीरने साहजिकच टीकास्त्र सोडले. कर्णधाराने प्रथम स्वतः लढावे, असे गंभीर उपहासाने म्हणाला.
धोनीने सातव्या स्थानी ज्या 29 धावा केल्या, त्या संघासाठी नव्हे तर फक्त स्वतःसाठी होत्या, अशी टीका गंभीरने पुढे केली. चौथ्या स्थानी सॅम करण, पाचव्या स्थानी ऋतुराज गायकवाड व सहाव्या स्थानी केदार जाधवला पाचारण करुन काहीच साध्य होणार नव्हते. त्याऐवजी धोनी लवकर फलंदाजीला आला असता तर तो आपल्या सहकाऱयांसमोर आदर्श ठेवू शकला असता, याचाही या माजी डावखुऱया फलंदाजाने उल्लेख केला. गंभीरने आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करत संघाला दोनवेळा जेतेपद संपादन करुन दिले आहे.
चेन्नईचा संघ या लढतीत एकवेळ 4 बाद 77 अशा अडचणीत असताना अनुभवी फॅफ डय़ू प्लेसिसने 37 चेंडूत 72 धावांची जोरदार आतषबाजी करत सामन्यात खऱया अर्थाने जान भरली. पण, नंतर मधली फळी गडगडल्यानंतर चेन्नईच्या डावाला सुरुंग लागला. धोनी सातव्या स्थानी उतरला त्यावेळी तर सामना चेन्नईच्या आवाक्यातून जवळपास निसटलाच होता. धोनीने शेवटच्या षटकात 3 षटकार जरुर खेचले, तेव्हा तर चेन्नईच्या पराभवाची फक्त औपचारिकता बाकी होती.









