उत्तराखंडमधील चर्चित विधानसभा मतदारसंघ
उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत एक असा मतदारसंघ आहे, जेथे जिंकणाऱया उमेदवाराचा पक्षच सत्तेवर येत असल्याचे मानले जाते. 1958 मध्ये तत्कालीन उत्तरप्रदेशच्या उत्तरकाशी मतदारसंघात काँग्रेसचे रामचंद्र उनियाल आमदार झाले, तेव्हा राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर 3 वेळा काँग्रेसचे कृष्ण सिंह आमदार झाले आणि तिन्हीवेळा राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. 1974 मध्ये उत्तरकाशी मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव घोषित झाल्यावर काँग्रेसचे बलदेव सिंह आर्य आमदार झाले, तेव्हाही काँग्रेसचे सरकार आले होते.
आणीबाणीनंतर राजकीय उलथापालथ होण्याच्या काळात जनता पक्ष अस्तित्वात आला. त्या काळात जनता पक्षाचे बर्फिया लाल जुवाठा निवडणुकीत विजयी झाले आणि राज्यात जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले. अशा स्थितीत उत्तरकाशी मतदारसंघाशी निगडित ही मान्यता कायम ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी गंगोत्री मतदारसंघात स्वतःची पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. तर आम आदमी पक्षाने कर्नल अजय कोठियाल यांना मैदानात उतरविले आहे. कोठियाल हे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे चेहरे असल्याने हा मतदारसंघ चर्चेत आला आहे.

यंदा त्रिकोणी लढत
गंगोत्री मतदारसंघात यंदा त्रिकोणी लढत होणार आहे. कर्नल कोठियाल उत्तर काशी जिल्हय़ातील नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ माउंटट्रेनिंगचे प्राचार्य राहिले आहेत. तसेच त्यांनी काही तरुण-तरुणींना जोडून एका युथ फौंडेशनची स्थापना केली होती. या फौंडेशनकडून शेकडो तरुण-तरुणींना सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाते. अनेक तरुण-तरुणी या प्रशिक्षणानंतर सैन्यात दाखल झाले आहेत, यामुळे तरुणाई आणि त्यांच्या कुटुंबाचा एक वर्ग कर्नल कोठियाल यांच्यासोबत उभा असल्याचे दिसून येते.
2000 साली उत्तराखंड या राज्याची निर्मिती झाल्यावर 2002 च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे विजय पाल सजवाण या मतदारसंघात विजयी झाले आणि तेव्हा काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. 2007 मध्ये भाजपचे कोपाल रावत विजयी झाले असता भाजपची सत्ता राज्यात आली होती.
2012 मध्ये काँग्रेसचे विजयपाल जिंकल्यावर राज्यात त्यांच्याच पक्षाचे सरकार स्थापन झाले होते. 2017 च्या निवडणुकीत भाजप उमेदवार गोपाल रावत विजयी झाल्यार राज्यात त्यांच्याच पक्षाचे सरकार सत्तेवर आले. 1958 पासून ही परंपरा कायम राहिली आहे. परंतु 2022 च्या आगामी निवडणुकीत ही परंपरा कायम राहणार की नाही हे पहावे लागणार आहे.
काँग्रेसचे उमेदवार विजयपाल सजवाण हे मातब्बर नेते मानले जातात. राज्यनिर्मितीपासून काँग्रेस पक्षात उलथापालथ घडून देखील त्यांनी पक्ष सोडलेला नाही. याचमुळे काँग्रेसच्या सेवादलासह काँग्रेसची हक्काची मतपेढी त्यांच्यासोबत ठामपणे उभी राहिली आहे. तसेच स्वतःच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांमुळे त्यांना पाठिंबा मिळतो. स्वतःची विकासकामे आणि भाजपच्या अपयशाचा मुद्दा उपस्थित करून सजवाण हे जनतेकडून मत मागत आहेत.
भाजपने यावेळी सुरेश चौहान यांना उमेदवारी दिली आहे. माजी आमदार गोपाल सिंह रावत यांचे निधन झाल्यावर अनेक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली होती. या नेत्यांनी अलिकडेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उत्तरकाशी दौऱयात स्वतःचे शक्तिप्रदर्शन केले होते. परंतु अचानक सुरेश चौहान यांना उमेदवारी जाहीर झाल्याने काही नेत्यांच्या बंडखोरीला भाजपला तोंड द्यावे लागत आहे.









