गंगाकाठावर मिळाली लाकडी पेटी
पेटीत जन्मकुंडलीसह मिळाली नवजात कन्या
उत्तरप्रदेशच्या गाझीपूरमध्ये मंगळवारी गंगा नदीत लाकडी पेटी वाहून जात असल्याचे एका नाविकाला दिसून आले. नाविकाने पेटी उघडून पाहिली असता त्यात एक नवजात कन्या आढळून आली. पेटीत दुर्गामातेसह अनेक देवीदेवतांचे फोटो लावले होते. यात एक जन्मकुंडली देखील मिळाली आहे. मुलीची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले.
गुल्लू चौधरी मल्लाह या नाविकाला ही लाकडी पेटी मिळाली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नवजात मुलीला बालगृहात ठेवून सरकारी निधीद्वारे पालन-पोषण करण्याचा आदेश दिला आहे. तसेच संबंधित नाविकाला घरासह सर्व सुविधा उपलब्ध करविण्यात याव्यात असा निर्देश गाझीपूर जिल्हाधिकाऱयांना दिला आहे.
जन्मपुंडलीत मुलीचे नाव गंगा लिहिलेले होते. तिचा जन्म 25 मे रोजी झाला आहे, म्हणजेच तिचे वय केवळ 3 आठवडे आहे. या नवजात मुलीला नाविकाने स्वतःच्या घरी नेले होते. त्याचे कुटुंबीय या मुलीला स्वतःकडे ठेवू इच्छित होते.









