राजापूर
देशभरात दुसऱया लाटेचा कोराना विषाणूचा कहर सुरू असताना राजापुरातील उन्हाळे येथील गंगामाईचे 30 एप्रिल रोजी आगमन झाले होते. गंगामाईचे आगमन होऊन 7 महिने उलटले तरीही ती अद्याप प्रवाहीत आहे. गंगा क्षेत्रातील चौदाही कुंडांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी साचले आहे. काशीकुंड तुडूंब भरल्याने गोमुखातून अखंड पाण्याचा स्त्राsत सुरू झाला आहे.
सर्वसाधारणपणे दर 3 वर्षांनी गंगा प्रकट होते व जवळपास तीन महिन्याच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावते असा प्रघात आहे. मात्र अलिकडच्या कालावधीत तिच्या या आगमन व निर्गमनच्या सर्वसाधारण नियमित कालखंडाला छेद गेला आहे. काही वर्षे तर ती सलग आली होती. काही वर्षापूर्वी तिच्या वास्तव्याचा कालावधीही खुपच लांबला होता. यावेळी 1 वर्ष 14 दिवसांनी गंगामाईचे आगमन झाले होते. अद्यापही गंगा क्षेत्रावरील सर्व कुंडे पाण्याने चांगलीच भरली आहेत. मुळगंगेसह चंद्रकुंड, सुर्यकुंड, नर्मदाकुंड, गोदावरी कुंड, चंद्रभागा कुंड, बाणकुंड, सरस्वती कुंड, कावेरीकुंड, भीमाकुंडामध्ये पाणी आहे. काशीकुंडातील पाणी गोमुखातून वाहत आहे. तर मुळ गंगेचा प्रवाहही चांगल्या स्वरूपात वाहत आहे. त्यामुळे निर्गमन लवकर होणार नसल्याचे संकेत आहेत.
गेली 2 वर्षे कोरोनामुळे लॉकडाऊन होते. त्यामुळे गंगा आगमनानंतर या ठिकाणी होणारी भाविकांची गर्दी, दुकानांची रेलचेल आणि त्याद्वारे होणारी लाखोंची आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. मात्र आता निर्बंध शिथील झाले. सर्व व्यवहार सुरळीत सुरू असतानाही भाविकांनी गंगामाईकडे पाठ फिरवलेली आहे. या ठिकाणी अद्यापही भाविक येत नसल्याने वर्दळ कमी आहे. काही कुंडातील पाण्यावर शेवाळी आलेली दिसून येत आहे.









