मुंबई इंडियन्सविरुद्ध सुपरओव्हर जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा किंग्स इलेव्हन पंजाबचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल त्या सुपरओव्हरपूर्वी खूपच नाराज आणि संतप्त होता, हे त्याच्या चेहऱयावरुनही दिसून येत होते. पहिला षटकार खेचल्यानंतर दुसऱया चेंडूवरही तो त्वेषाने तुटून पडणार, अशीच चिन्हे होती. तसा त्याने प्रयत्नही केला. पण, चेंडू टप्प्यात आला नाही आणि ख्रिस गेलला एकेरी धावेवर समाधान मानावे लागले. पण, 6 चेंडूत 12 धावांची गरज असताना गेलच्या या 2 चेंडूतील 7 धावांचा पंजाबच्या विजयात निर्णायक वाटा राहिला. अर्थात, सुपरओव्हरमध्ये फलंदाजीला उतरण्यापूर्वी हा युनिव्हर्सल बॉस नाराज, संतप्त का होता, याचा उलगडा आता झाला आहे.
आता असे वाटू शकते की, ख्रिस गेल त्याला या हंगामात पंजाब संघाकडून संधी मिळत नसल्याने, डावलले जात असल्याच्या भावनेतून नाराज असू शकेल. पण, प्रत्यक्षात तसे अजिबात नाही. कारण, ख्रिस गेल याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाला की, ‘आमच्या संघाला दुसऱया सुपरओव्हरपर्यंत यावे लागले, यासाठी मी नाराज होतो. खरं तर हा सामना आम्ही त्यापूर्वीच जिंकणे हवे होते’.
त्यापूर्वी, पहिली सुपरओव्हर टाय झाली, त्यावेळी मोहम्मद शमीने केवळ 5 धावा दिल्या होत्या आणि त्याचा उल्लेख करताना ख्रिस गेलने शमीच आपला सामनावीर असल्याचे नमूद केले. ‘रोहित शर्मा व डी कॉकसारखे जागतिक स्तरावरील अव्वल, कसलेले फलंदाज समोर असताना केवळ पाच धावांचे संरक्षण करणे अतिशय आव्हानात्मक होते आणि ते शक्य करुन दाखवले, यातच शमीचे कसब सिद्ध होते. मी स्वतः शमीला नेट्समध्ये अनेकदा सामोरे गेलो आहे आणि शमीच्या यॉर्करचा सामना करताना स्वतःचा बचाव करुन घेणे हेच मुख्य असल्याचे मला जाणवत आले आहे’, असे ख्रिस गेल येथे म्हणाला.
दरम्यान, शमीने देखील सुपरओव्हरमध्ये केवळ 5 धावांचे संरक्षण करणे कठीण होते, असे कबूल केले. सुपरओव्हरमध्ये 15 ते 17 धावांचे संरक्षण करायचे असेल तर परिस्थिती वेगळी असते. पण, धावाच कमी असतील तर परिस्थिती केव्हाही हाताबाहेर जाऊ शकते, असे तो म्हणाला. यंदाच्या हंगामात मोहम्मद शमीच्या खात्यावर आतापर्यंत 14 बळी नोंद आहेत.









