लव्ह जिहादचा उल्लेख करत केरळमधील चर्चचा आरोप : राज्यातील हिंदुत्ववादी संघटनेच्या दाव्यांना मिळाले बळ
वृत्तसंस्था/ कोची
केरळमधील एका कॅथोलिक चर्चने ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा उपस्थित करत राज्याच्या मोठय़ा संख्येतील ख्रिश्चन महिलांना जाळय़ात ओढून इस्लामिक स्टेट आणि दहशतवादी कारवायांमध्ये गुंतविले जात असल्याचा आरोप केला आहे. कार्डिनल जॉर्ज ऍलनचॅरीच्या अध्यक्षतेखालील पाद्रींच्या एका संस्थेने लव्ह जिहादच्या प्रकरणांना राज्य सरकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप केला आहे. तर पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाने (पीएफआय) हे आरोप फेटाळून लावले आहेत.
तर विश्व हिंदू परिषदेने चर्चच्या भूमिकेचे स्वागत करत केरळच्या समाजात सुरू असलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात संयुक्त लढय़ाचे आवाहन ख्रिश्चनधर्मीयांना केले आहे. पण केरळ राज्य महिला आयोगाने या मुद्दय़ावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. पोलीस आणि सरकारकडूनही यावर कुठलीच प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही.
पालकांना आवाहन
पाद्रींच्या धर्मसभेने एका पोलीस नोंदीचा दाखला दिला आहे. यानुसार 20 जणांना इस्लामिक स्टेटमध्ये भरती करण्यात आले होते आणि यातील निम्मे मूळचे ख्रिश्चनधर्मीय होते. अनेक युवतींचा लव्ह जिहादच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांमध्ये वापर केला जात असल्याचेही उघड झाले आहे. हे एक गंभीर प्रकरण असून लव्ह जिहाद ही कपोकल्पित बाब निश्चितच नाही. लव्ह जिहादमध्ये सामील गुन्हेगारांच्या विरोधात त्वरित कारवाई केली जावी. तसेच आईवडिल तसेच मुलांना लव्ह जिहादच्या धोक्यांसंबंधी जागरुक करण्याचे प्रयत्न व्हावेत असे धर्मसभेने म्हटले आहे.
पीएफआयची नकारघंटा
केरळमधील लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये पीएफआय महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा आरोप कित्येक वर्षांपासून होत आला आहे. राज्यात मुस्लिमांची संख्या वाढविण्यासाठी लव्ह जिहादचा अवलंब केला जात नसल्याचा दावा पीएफआयचे राज्य प्रमुख नजीरुद्दीन इलामरम यांनी केला आहे. केरळमध्ये आंतरधर्मीय विवाह होत असून त्याला लव्ह जिहादचे नाव देता येत नसल्याचे ते म्हणाले.
लव्ह जिहाद सुरूच
केरळमध्ये लव्ह जिहाद होत असून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तरुण हिंदू आणि ख्रिश्चनधर्मीय युवतींना जाळय़ात ओढून त्यांचे धर्मांतर घडवून आणत आहेत. या धर्मांतरित युवतींचा अमली पदार्थांची तस्करी तसेच दहशतवादासाठी वापर केला जात असल्याचा दावा विहिंपचे माजी प्रदेशाध्यक्ष एसजेआर कुमार यांनी केला आहे. चर्चचे पदाधिकारीही लव्ह जिहादच्या धोक्याबद्दल बोलू लागल्याने आनंद आहे. सर्वांनी एकजूट होत लव्ह जिहादचा सामना करण्याची हीच वेळ असल्याचे ते म्हणाले.
लव्ह जिहादचा कट
सिरो-मालाबार चर्चने मंगळवारी प्रसारमाध्यमांकरता निवेदन प्रसिद्ध केले आहे. केरळमध्ये लव्ह जिहादच्या नावाखाली ख्रिश्चन युवतींच्या हत्येची प्रकरणे समोर आली आहेत. नाताळावेळी नायजेरियात ख्रिश्चनांच्या हत्येचा प्रकार थरकाप उडविणारा होता. लव्ह जिहाद केरळमधील सामाजिक शांतता आणि सांप्रदायिक सौहार्द धोक्यात आणत असल्याने हा चिंतेचा विषय आहे. केरळमध्ये अत्यंत सुनियोजित पद्धतीने ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादद्वारे लक्ष्य केले जात असल्याचे चर्चने म्हटले आहे.









