वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात होणाऱया विविध वयोगटातील क्रिकेट स्पर्धांसाठी या क्रिकेटपटूंनी आपल्या वयाच्या नोंदणीचा दाखल चुकीचा सादर केला आहे पण या क्रिकेटपटूंनी स्वत:हून आपला गुन्हा कबुल केल्यास त्यांना भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाकडून (बीसीसीआय) कोणतीही शिक्षा केली जाणार नाही त्यांना या गुन्हय़ाबद्दल माफ केले जाईल पण अनियमित योजनेत ते दोषी आढळले तर त्यांच्यावर दोन वर्षांची बंदी घातली जाईल, असे मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले.
या नव्या निर्णयाची अंमलबजावणी 2020-21 च्या क्रिकेट हंगामातील मंडळाच्या विविध वयोगटातील क्रिकेट स्पर्धांमध्ये केली जाईल. यापूर्वी या क्रिकेटपटूंनी मंडळाच्या विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी खोटय़ा जन्म तारखेच्या दाखल्याची नोंद केली आहे. त्यांनी स्वत:हून आपला हा गुन्हा मान्य केल्यास त्यांना मंडळाकडून माफ केले जाईल. या क्रिकेटपटूंनी आपल्या जन्म तारखेमध्ये भूतकाळामध्ये चुकीची माहिती सादर केली असली तरी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई न करताना त्यांना योग्य वयोगटातील क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यास मंडळाकडून परवानगी दिली जाईल, असेही मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले. बऱयाच क्रिकेटपटूंनी यापूर्वी आपल्या खोटय़ा जन्म तारखेचा दाखला बीसीसीआयकडे सादर केल्या असल्याचे सांगण्यात आले. अशा क्रिकेटपटूंनी आता आपल्या जन्म तारखेचा खरा दाखला आपल्या स्वत:च्या सहीनिशी 15 सप्टेंबर 2020पर्यंत मंडळाकडे इमेलद्वारे पाठवणे जरूरीचे आहे. त्यानंतर मंडळाच्या नियुक्त केलेल्या वयाची शहानिशा करणारा विभाग यावर निर्णय घेईल.
आतापर्यंत काही क्रिकेटपटूंनी विविध वयोगटाच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळताना आपल्या वयाचा खोटा दाखला मंडळाकडे सादर केला असेल त्यांनी स्वत:हून आपला गुन्हा मान्य करावा नाही तर अशा दोषी क्रिकेटपटूंवर कडक कारवाई मंडळाकडून केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. अनियमित योजनातंर्गत नियमांचे उल्लघंन करणाऱया क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी घातली जाईल, असे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले. देशातील जवळपास सर्व पुरूष आणि महिला वरिष्ठ क्रिकेटपटूंकडून डोमेसिल प्रमाणपत्र सादर करताना चुकीची माहिती दिल्याचे आढळून आले आहे, अशा क्रिकेटपटूंवर दोन वर्षांची बंदी घातली जाईल. क्रिकेटपटूंच्या खोटय़ा वयाच्या दाखला प्रकरणांची मंडळाकडून गंभीर दखल घेतली जात असून मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सौरभ गांगुली तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमी प्रमुख राहुल द्रविड यांनी अशा प्रकरणावर आपले लक्ष अधिक केंद्रीत करण्याचे ठरविले आहे.
16 वर्षांखालील वयोगटाच्या स्पर्धेसाठी 14 ते 16 वर्षांच्या क्रिकेटपटूंना आपली नावे नोंद करण्यास परवानगी दिली जाईल. मात्र 19 वर्षांखालील वयोगटातील स्पर्धेसाठी एखाद्या क्रिकेटपटूच्या जन्म तारखेमध्ये आणि प्रत्यक्षात दोन वर्षांचा फरक दिसून आला तर त्यांना या वयोगटातील स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही. खोटय़ा वयाच्या दाखला सादर करून काही क्रिकेटपटूंनी विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये आपला सहभाग दर्शविला असेल तर त्यांनी स्वत:हून आपला गुन्हा कबुल करावा, असे आवाहन राहुल द्रविडने केले आहे.









