ऑनलाईन टीम / नागपूर :
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर राजीनामा द्यावा लागलेले शिवसेना नेते संजय राठोड आणखीन एका प्रकरणात अडकल्याची माहिती मिळाली आहे. संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. या आरोपाला संजय राठोड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राठोड यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, खोटय़ा तक्रारी करून माझे राजकीय जीवन संपविण्याचे हे षडयंत्र आहे. संस्थेत नोकरी मिळावी म्हणून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले आहेत. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. केवळ वैफल्यातून हे आरोप करण्यात आले आहेत, असा दावा संजय राठोड यांनी केला आहे.
संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील लावण्यात आलेल्या आरोपांचा विरोध केला आहे. ते म्हणाले, वेगवेगळ्या नंबरवरून मला धमक्यांचे फोन आले आहेत. याबाबत मी मे महिन्यातच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. खोटय़ा तक्रारी देऊन माझे राजकीय जीवन संपविण्याचे हे षडयंत्र आहे. मात्र अशा आरोपांनी माझे जीवन संपणार नाही. या आरोपांची सखोल चौकशी करावी, जेणेकरून सत्य समोर येईल असेही राठोड यांनी यावेळी म्हटले आहे.
- काय आहे प्रकरण ?
मी एका संस्थेचा प्रतिनिधी होतो. शिवपुरी येथे या संस्थेच्या माध्यमातून आश्रम शाळा सुरू आहे. या शाळेतील तीन कर्मचारी सातत्याने गैरहरज राहिल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. त्यानंतर संस्थेने मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरती पदे भरण्याची परवानगी घेऊन तात्पुरती पदे भरली. तशी जाहिरात दिली होती. एका शिक्षकाचे प्रकरण झाले. याने सहायक आयुक्तांकडे राजीनामा दिला. 13 एप्रिल 2017 मध्ये राजीनामा दिला. नंतर हे प्रकरण नव्हतं. पण नंतर त्या शिक्षकाचे नातेवाईक आले आणि नोकरीवर घेण्याची विनंती होते. पण कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्याने तुम्हाला नोकरीवर घेऊ शकत नसल्याचे त्यांना मी सांगितले. त्यानंतर मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरू झाला. या प्रकरणी मी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, महिलांना पुढे करत सदर प्रकरणाचा आता राजकारणासाठी वापर केला जात आहे असा आरोप राठोड यांनी केला आहे.








