सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी तालुका मराठा समाज संघटनेचा इशारा
मराठा समाज हा सर्व जाती धर्मातील घटकांना,बारा बलुतेदारांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे, आपल्या न्याय्य हक्कासाठी समाज लढत असला तरी कधी जातीपातीचे राजकारण करत नाही. मात्र ,राजकीय हेतूने प्रेरित होऊन आमच्या एखाद्या समाज बांधवाला कुणीतरी दाबण्याचा प्रयत्न करत असेल व त्याच्यावर खोटी जातीवाचक तक्रारी नोंदवून अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर मराठा समाज पूर्ण ताकदीनिशी त्याच्या पाठीशी उभा राहील असे सावंतवाडी तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे यांनी मॅंगो हॉटेलमध्ये मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.
यावेळी मराठा समाज बांधव मेघशाम काजरेकर, आबा सावंत, शिवदत्त घोगळे, ऋतिका दळवी व कोलगाव ते ग्रामस्थ उपस्थित होते, यावेळी बोलताना अध्यक्ष सिताराम गावडे यांनी कोलगाव मध्ये मराठा समाजाचा कार्यकर्ता व ग्रामपंचायत सदस्य संदीप गवस याच्यावर खोटा जातीवाचक गुन्हा एका अल्पवयीन मुलीला हाताशी धरून घालण्यात आला आहे ,मुळात अशा प्रकारची घटना घडली नाही, केवळ पावसाच्या पाण्याचा निचरा होणाऱ्या गटारावरून पंधरा दिवसांपूर्वी झालेली बाचाबाची व त्यानंतर रचण्यात आलेले कुभांड यावरून ही तक्रार राजकीय हेतूने प्रेरित होऊन केल्याचे निष्पन्न होत आहे.
पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून निरपराध माणसाला बळीचा बकरा करू नये, असे आवाहन यावेळी बोलताना सिताराम गावडे यांनी यावेळी केले व मराठा समाज बांधवाला त्याचा दोष नसताना चुकीच्या पद्धतीने अडकविले गेल्यास व त्या अडकवणाऱ्या व्यक्तीस कोणत्याही राजकीय पक्षाने पाठिंबा दिल्यास त्या पक्षालाही त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही यावेळी बोलताना दिला.
यावेळी मराठा समाजाचे कार्यकर्ते व माजी पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर यांनी कोलगाव येथील घडलेली घटना हे निव्वळ रचलेले कुभांड आ,हे अशी कोणतीही घटना घडली नाही, संबंधित अल्पवयीन मुलगी ही लहानपणापासूनच संदीप गवस यांच्याकडे सांभाळायला असायची त्यांचे व कुटुंबीयांचे चांगले संबंध होते,मात्र असे असताना सदरच्या अल्पवयीन मुलीला जातीवाचक बोलणे अशा प्रकारची तक्रार करणे हे धादांत खोटे आहे, यामागे राजकीय शक्तीचा हात असल्याचा आरोप काजरेकर यांनी केला. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले व समाजाची बाजू मांडण्यात आली व योग्य पद्धतीने तपास करून न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.









