ऑनलाईन टीम / लखनऊ :
आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनावल यांची खोटी सही करुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खात्यामधून पैसे काढल्याच्या आरोपाखाली 5 जणांना उत्तर प्रदेशमधील गोरखपूर आणि बस्ती जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी आसाम मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खात्यावरील हिशोबात गोंधळ असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर हा तपास विशेष पथकाकडे देण्यात आला. तपासादरम्यान उत्तरप्रदेश आणि हरियाणात मुख्यमंत्री मदतनिधीशी संबंधित पैसे काढण्यात आल्याचे समोर आले. आरोपींनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनावल यांची खोटी सही आणि कागदपत्रे सादर करून थेट मदत निधीच्या खात्यातून रक्कम काढली.
पोलीस अधीक्षक रोसी कालिता यांनी याप्रकरणी पाच जणांवर एफआयआर दाखल केला. त्यानंतर तपास पथकातील सात पोलीस कर्मचाऱ्यांनी गोरखपूर आणि बस्ती येथील काही ठिकाणी छापे मारून पाच जणांना अटक केली. तसेच त्यांनी गैरव्यवहार करून काढलेली सर्व रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली.









