प्रतिनिधी / कोल्हापूर
खोची (ता. हातकणंगले) येथे दोन वर्षापूर्वी आलेल्या महापूरात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना अद्याप मदत मिळालेली नाही. त्याच्या निषेधार्थ नऊ जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. बुधवारी तिसर्या दिवशीही हे आंदोलन सुरु राहीले.
जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ऑगस्ट, सप्टेंबर 2019 मध्ये आलेल्या महापूरात मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे चुकीच्या पध्दतीने झाल्यामुळे मदतीस पात्र असतानाही तुटपुंजी मदत मिळाली आहे. सरकार व प्रशासनाच्या माध्यमातून पूरग्रस्तांची दिशाभूल करण्यात आली आहे. यासंदर्भात वारंवार हातकणंगले तहसिलदार कार्यालय येथे पाठपुरावा करुनही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. यामध्ये आंदोलकांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास याची जबाबदारी प्रशासनावर राहील.
आंदोलनात अभिजीत वाघ, बंडू थोरवत, सोनाजी गोसावी, बाबूराव नाईक, बाळासो पोवार, लक्ष्मण घाटगे, सुर्यकांत गिरिगोसावी, भरत नाईक, रावसो नाईक आदी सहभागी झाले आहेत.









