प्रतिनिधी / खेड
खेड नगरपरिषदेकडून अनधिकृत खोक्यांवर करण्यात आलेली कारवाई की कारवाईचे नाटक होते ? असा प्रश्न उपस्थित करत जनतेच्या हितासाठी आपले विशेषाधिकार वापरण्याचे नाटक करणारे नगराध्यक्ष वैभव खेडेकर याप्रकरणी नक्की कोणाचे हित साधत आहेत ? असा सवाल शिवसेनेचे गटनेते प्रज्योत तोडकरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
अनधिकृत खोक्यांवरील कारवाई हा खोकेधारकांच्या उत्पन्नाचा प्रश्न आहे, हे शिवसेनेचे सर्व नगरसेवक जाणून आहेत. वास्तविक जिजामाता उद्यानानजीक अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या नवीन खोक्यावर कारवाई करण्यासंबंधी मुख्याधिकाऱ्यांकडे पत्र व्यवहार करण्यात आला होता. याप्रश्नी तालुका रिपाईनेही १६ सप्टेंबर रोजी निवेदन देत कारवाई न केल्यास आमरण उपोषणाचा इशाराही दिला होता. मात्र, खोक्यावर कारवाई न झाल्याने याच पक्षाने उपोषण छेडले असता खोक्यावर कारवाई करण्याचे आश्वासन देखील नगराध्यक्षांनी दिले होते.
मात्र, नगराध्यक्ष वैभव खेडेकर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या शब्दावरच हा खोका उभारला गेला असल्याची दाट शक्यताही आहे. त्या खोक्याविषयी अनेक नागरिकांनी विचारणा करत कारवाईची मागणी तसा पत्रव्यवहार देखील केला होता. या पत्र व्यवहारानंतर कारवाईची निश्चिती देखील झाली होती. मात्र, हे अनधिकृत खोके उभे राहतातच कसे ? कोणाच्या सांगण्यावरून उभे राहतात ? यासाठी कोणाचे पाठबळ ? असा प्रश्न उपस्थित करत राजकीय फायद्यासाठीच हा सारा खटाटोप असल्याचा आरोपही केला आहे.
अनधिकृत खोके उभारण्यास भाग पाडणारे नगराध्यक्ष कायदेशीर पूर्तता करण्यास असमर्थ असल्याचे लक्षात आल्यानंतरच विरोधी पक्षावर कारवाईचे खापर फोडून स्वत: ची पोळी भाजून घेण्याचा खटाटोप करत असून शिवसेनेची हकनाक बदनामी करत आहेत. हे कदापीही खपवून घेणार नाही, असा टोलाही निवेदनाद्वारे लगावला आहे.









