प्रतिनिधी/ सातारा
आसाम राज्यात गुवाहाटी येथे सुरु असलेल्या तिसऱया खेलो इंडिया स्पर्धेत सातारा एक्सप्रेस सुदेष्णा शिवणकर हिच्या सुवर्ण पदकानंतर साताऱयाला दुसरे सुवर्ण पदक मिळवून देण्यात वेटलिफ्टर अनंत इंग्लिश स्कूलची वैष्णवी संतोष पवार यशस्वी ठरली आहे. तिच्यासह साताऱयाची दुसरी अनंतची माजी विद्यार्थिनी व कला वाणिज्य कॉलेजची वेटलिफ्टर मयुरी रामचंद्र देवरे हिने देखील सिल्वर पदकावर मोहर उठवत जिल्हय़ाची मान उंचावली आहे.
अनंत इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या वैष्णवी पवार व मयुरी देवरे यांनी पुण्यात झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत पदकांची लयलूट केली होती. आता तिसऱया खेला इंडिया स्पर्धेत त्या दोघी पदकाच्या मानकरी ठरल्याने साताऱयाच्या क्रीडा क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आसाम राज्यातील गुवाहाटी येथे सुरु असलेल्या तिसऱया खेलो इंडिया स्पर्धत 81 किलो वजन गटातील युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत वैष्णवी पवार हिने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकावले तर 81 किलो ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत मयुरी देवरे द्वितीय क्रमांक मिळवत सिल्व्हर पदक पटकावले आहे.
वैष्णवीने स्नॅच 62 किलो, किलिन अँड जर्क 72 किलो एकूण वजन 134 किलो उचलले व मयुरी स्नॅच 76 व किलिन अँड जर्क 105 किलो केला एकूण वजन 181 किलो उचलले. या दोघींना अनंत इंग्लिश स्कूलचे क्रीडा मार्गदर्शक जितेंद्र देवकर यांचे मार्गदर्शन लाभले असून या यशाबद्दल त्या दोघांसह प्रशिक्षक देवकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









