प्रतिनिधी / खेड
खेड तालुक्यातील भेलसई-बौद्धवाडी येथील एका उच्चशिक्षित तरूणीचा साखरपुड्याच्या विधीतून चोरीस गेलेला मोबाईल येथील पोलिसांच्या सतर्कतेने तिला परत मिळाला. अज्ञात चोरट्याने अटकेच्या भीतीने स्वत: हूनच तो मोबाईल रविवारी सायंकाळच्या सुमारास तरूणीच्या घरासमोरच नेवून ठेवल्याची बाब पुढे आली आहे.
तीन दिवसापूर्वी या तरूणीचा साखरपुडा होता. साखरपुडा विधीच्या धामधुमीतून अज्ञात चोरट्याने १५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल लंपास केला. साखरपुड्याच्या विधीमुळे सुरूवातीला मोबाईल हरवल्याचे तरूणीच्या लक्षात आले नाही, मात्र, सर्व विधी आटोपल्यानंतर मोबाईल चोरीस गेल्याचे तिच्या लक्षात आले. लग्नाच्या गडबडीमुळे तरूणीने पोलीस स्थानकात तक्रार देण्याचे टाळत केवळ तोंडी घडलेला प्रकार कथन करत काही संशयितांची नावे देखील पोलिसांना सांगितली.
मोबाईल चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाला गती दिली. संशयितांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक लोटे व भेलसई येथे पोहचले. पोलिसांनी संशयितांवर करडी नजर ठेवली. पोलीस मागावर असल्याचे अज्ञात चोरट्यांच्या लक्षात आल्यानंतर चोरलेला मोबाईल रविवारी सायंकाळच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत तरूणीच्या घरासमोरच नेवून ठेवला.
घरासमोर ठेवलेला मोबाईल तरुणीच्या दृष्टीस पडताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीस गेलेला मोबाईल परत मिळाल्याने तरूणीच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.









