मार्च अखेरपर्यंत मिळणार ६० लाखाचा वाढीव निधी, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आश्वासन
प्रतिनिधी / खेड
खेड तहसील कार्यालयाच्या इमारतीचे आणखी रूपडे पालटणार आहे. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आणखी ६० लाखाचा वाढीव निधी मार्च अखेरपर्यंत देण्याचे आश्वासन दिले आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या नव्या इमारतीचाही प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही दिले.
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार जिल्हा दौऱ्यावर आले असता येथील तहसील कार्यालयास भेट देत इमारतीची पाहणी केली. यानंतर पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आढावा बैठक घेतली. कोरोनाचे संकट असले तरी जनतेच्या आरोग्यासह विकासासाठी सरकार तत्पर आहे. आमदार योगेश कदम यांच्या दापोली मतदार संघातील विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याने ही आश्वासन दिले.
महामार्ग चौपदरीकरण कामात भू – संपादित शेतकऱ्यांना येत्या १० दिवसात निधी वर्ग करण्याचे आदेश प्रांत अधिकारी अविशकुमार सोनोने यांना दिले. शासकीय योजनांच्या माध्यमातून खर्च झालेल्या जमिनी शासनाच्या नावे दोन महिन्यात वर्ग करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले. महामार्गावरील बहुतांश नळपाणी योजना नादुरूस्त झाल्या असून या योजनांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महामार्ग प्राधिकरणाला दिल्या.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला नुकसानीनुसार जास्तीत जास्त मदत देणार असून ग्रामीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचेही स्पष्ट केले. आमदार योगेश कदम यांनी अल्पावधीतच मतदार संघाच्या विकासाचा आराखडा तयार करत सर्वाधिक निधीची मागणी केली असून त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करणार असल्याचेही शेवटी सांगितले.
याप्रसंगी आमदार योगेश कदम, जि.प.अध्यक्ष रोहन बने, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती सुनिल मोरे, जि.प.सदस्य अरूण कदम, पंचायत समिती सभापती विजय कदम, उपसभापती जीवन आंब्रे, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांच्यासह सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.









