उच्च-तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती, जप्त वाहने 28 दिवसांनंतर ताब्यात देण्याच्या सूचना
प्रतिनिधी/ खेड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरिबांना कमीत कमी पैशात जेवण मिळावे यासाठी शहरात सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन केंद्रावरील थाळय़ांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी येथे आले असता येथील पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. मात्र, यासाठी नागरिकांचेही सहकार्य तितकेच गरजेचे आहे. नागरिकांकडून पुरेपूर सहकार्य मिळाल्यास ऑरेंज झोनमध्ये असलेला जिल्हा नक्कीच ग्रीन झोनमध्ये येईल. यासाठी अत्यावश्यक सेवेशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले.
कोकणातील कोरोनाचा पहिला बळी खेडमध्ये गेला ही दुर्दैवी बाब आहे. या घटनेतून बोध घेवून प्रत्येकानेच खबरदारी घ्यायला हवी. कोरोना संशयित रूग्णांसाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात आयसोलेशन कक्ष निर्माण करण्यात आला आहे. याठिकाणी पुरेसे कर्मचारी व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या. कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने या रूग्णालयात केवळ विलगीकरण कक्ष तर रत्नागिरीतील शासकीय रूग्णालयात कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही स्पष्ट केले.
जिल्हय़ात सुरू असलेल्या पायाभूत विकासकामांना लवकरच चालना देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील जनतेला योग्य प्रकारे रास्तदराचे धान्य उपलब्ध व्हावे, याकरिता ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. संचारबंदीत पोलीस प्रशासनाने जप्त केलेल्या चारचाकी व दुचाकी जप्त केल्याच्या तारखेपासून 28 दिवसांनंतर संबंधितांच्या ताब्यात देण्याच्या सूचनाही पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
कोरोनामुळे तालुक्यात अडकून पडलेल्या मजुरांना स्थानिक प्रशासन करत असलेल्या मदतीची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रशंसा केली. याप्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार योगेश कदम आदी उपस्थित होते.









