प्रतिनिधी/ खेड
शहरातील महात्मा फुलेनगर येथील अंगणवाडी क्रमांक 2 येथील मुलांना मंगळवारी देण्यात आलेल्या पोषण आहारातील धान्यात किडे व अळ्य़ा आढळल्याचा प्रकार पुढे आला आहे. पालकांनीच ही बाब उजेडात आणली असून प्रशासन मुलांच्या जीविताशी खेळत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. यापुढे अशा प्रकारचे धान्य कदापीही घेणार नाही, अशी आक्रमक भूमिकाही पालकांनी घेतली आहे.
शासनाकडून अंगणवाडीमध्ये पोषण आहाराचे वाटप केले जाते. एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यावर देखरेखीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोषण आहार वाटपासाठी ठेकेदारी पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे. मात्र, याच ठेकेदारांकडून अंगणवाडीतील मुलांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार येथे सुरू असल्याचे समोर आले आहे.
शहरातील महात्मा फुले येथे असलेल्या अंगणवाडी क्रमांक 2 येथून मुलांना पोषण आहारापोटी देण्यात आलेल्या धान्यात किडे व अळ्य़ा आढळल्याने खळबळ उडाली आहे. संतप्त पालकांनी हे धान्य घेण्यास नकार दर्शवत प्रशासनाच्या गलथान कारभारावर ताशेरे ओढले आहेत. दरमहा पोषण आहाराचे धान्य देण्याचा नियम असतानाही 5 महिन्यानी हे धान्य वित्ग्नारित करण्यात आल्याची बाबही पुढे आली आहे.
यापूर्वी जुलै महिन्यात या अंगणवाडीतील मुलांना पोषण आहाराचे धान्य वाटप करण्यात आले होते. ते देखील निष्कृष्ट दर्जाचेच होते, असा आरोप पालकांनी केला आहे. या पोषण आहाराचा ठेका जालना येथील ठेकेदारास देण्यात आल्याचे समजते. त्या ठेकेदारानेच निष्कृष्ट दर्जाचा पोषण आहार पाठवल्याचे व ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातल्याचे येथे कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकेने सांगितले. या बाबत येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.









