नाट्यगृहासाठी ६ कोटीचा निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांना साकडे
राजू चव्हाण / खेड
गेल्या १५ वर्षापासून बंदावस्थेत असलेल्या कै. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाला अखेरची घरघर लागलेली असतानाच लवकरच नाट्यगृहाला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. आमदार योगेश कदम नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी पुढे सरसावले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी ६ कोटी रूपयांचा निधी देण्याची आग्रही मागणी निवेदनाद्वारे केली आहे.यामुळे नाट्यगृहाच्या पडद्याची गाठ सुटण्याच्या शक्यतेने नाट्यरसिकांसह स्वयंसेवी संस्थाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
सांस्कृतिक चळवळीला उभारी देण्यासाठी उभारण्यात आलेले कै. मीनाताई ठाकरे नाट्यगृह गेल्या १५ वर्षांपासून बंद आहे. नाट्यगृहाच्या दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्षच करण्यात आल्याने नाट्यगृहाला अखेरची घरघर लागली आहे. नाट्यगृहाचा पडदा उघडण्यासाठी आजवर अनेक लोकप्रतिनिधींनी बऱ्याचदा घोषणा देखील केल्या. मात्र, या साऱ्या घोषणा हवेतच विरळ्या आहेत. सातत्याने नाट्यगृहाच्या दुरुस्तीवर लाखों रूपयांचा चुराडा करून देखील ऐनकेन कारणाने दुरूस्तीचा खर्च वाढतच गेल्याने त्यानंतर निधीअभावी नाट्यगृह अखेरची घटकाच मोजत आहेत.
२०१६ मध्ये नाट्यगृहाचा पडदा उघडण्यासाठी १३ व्या वित्त आयोगातून ३५ ते ४० लाख रूपयांची तरतूद करून नाट्यगृहाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आल्याने नाट्यगृह खुले होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यासाठी ज्यादा निधी लागल्यास न.प. फंडातून उचलण्याची तयारी देखील नगरप्रशासनाने केली होती. त्यानुसार नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी १३ व्या वित्त आयोगातून पुन्हा ५० ते ६० लाखाच्या निधीची तरतुद करून प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, तशा तरतुदीस मंजुरी देता येत नसल्याचा ‘शेरा’ मारण्यात आल्याने ही फाईल लालफितीतच अडकल्याने नाट्यगृह खुले होण्याची आशा धुळीसच मिळाली होती.
वर्षानुवर्षे नाट्यगृह बंदच असल्यामुळे विशेषत: स्वयंसेवी संस्थांची चांगलीच परवड होत आहे. सांस्कृतिक उपक्रमांसाठी खासगी सभागृहांचा आधार घ्यावा लागत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विवाह समारंभासह अन्य कार्यक्रमांसाठीही खासगी सभागृहांकडेच धाव घ्यावी लागत होती. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या प्रक्रियेला पूर्णविराम मिळण्याची सारेचजण आतुरतेने वाट पहात होते. मात्र, नगरप्रशासनाने दाखवलेल्या उदासीनतेमुळे वर्षानुवर्षे साऱ्यांच्याच पदरात निराशाच पडली होती.
माजी पर्यावरणमंत्री व आमदार रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार योगेश कदम यांनी नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेत नाट्यगृहासाठी ६ कोटी रूपयांचा निधी देण्याची मागणी करत तातडीने मंजुरी देण्याचे साकडे घातले आहे. आमदार कदम यांच्या मागणीस मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने गेल्या १५ वर्षापासून बंदावस्थेत असलेल्या नाट्यगृहासाठी निधीची उपलब्धता होणार आहे. यामुळे बंदावस्थेतील नाट्यगृह लवकरच नाट्यरसिकांसाठी खुले होण्याच्या शक्यतेने नाट्यरसिकांसह स्वयंसेवी संस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.