प्रतिनिधी/ वडूज
कलेढोण (ता. खटाव) येथील बोबडे मळा शिवारातील एका महिलेचा खून व महिलेच्या अंगावरचे सोन्या-चांदीचे चोरून नेल्याप्रकरणी सचिन मच्छिंद्र शिरतोडे (वय 27 रा. कलेढोण ता. खटाव) यास येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व 7 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
1 जून 2016 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कलेढोण गावच्या हद्दीत बोबडेमळा नावचे शिवारात मयत नामे सौ. शकुंतला बबन कणसे (वय 48 वर्षे, रा. कलेढोण, ता. खटाव) हया आपल्या गोटय़ातील जनावरांना चारापाणी करुन जवळ असले मल्हारी नामदेव माळी यांच्या लिंबाच्या झाडाखाली सावलीत एकटय़ा झोपल्या असताना आरोपी नामे सचिन मच्छिंद्र शिरतोडे याने जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने तेथे वैरण तोडण्यासाठी ठेवलेल्या कुऱहाडीने मयताचे उजवे गालावर कानाचे जवळ धारेकडून घाव घालून गंभीर जखमी करुन खून केला व मयत महिलेच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले होते. त्याप्रमाणे सांगितल्याने गुन्हा वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गुन्हय़ाचा वडूज पोलीस ठाण्याचे सपोनि रविंद्र गायकवाड यांनी तपास करुन साक्षीदारांचे जबाब नोंदविले. तसेच वैद्यकीय पुरावा जमा करून तसेच सदर गुन्हय़ातील आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून जबरी चोरी केलेला सोने व चांदी असा मुद्देमाल जप्त केला. तसेच तपास करुन आरोपीविरुध्द अतिरिक्त जिल्हा व न्यायालय, वडूज येथे दोषारोप दाखल केले.
येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात याकामी सरकार पक्षाच्या वतीने सहा. जिल्हा सरकारी वकील वैभव एच. काटकर यांनी काम पाहिले. यामध्ये 13 साक्षीदार सरकार पक्षाच्यावतीने तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाबजबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकील यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय़ धरुन तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना परिस्थितीजन्य पुरावा ग्राहय़ धरुन जादा सह जिल्हा व सत्र न्यायाधिश पी. वाय. काळे यांनी आरोपीला दोषी ठरवून आज बुधवार 27 रोजी आरोपी यास कलम 302 प्रमाणे जन्मठेप व दंड 5 हजार तसेच कलम 397 प्रमाणे 7 वर्षे सक्तमजुरी कारावास व दंड 2 हजार रुपये व दोन्ही दंड न भरल्यास प्रत्येकी दोन महिने शिक्षा प्रमाणे शिक्षा दिली. याकामी सरकारी वकील यांना प्रॉसिक्युशन स्क्वॉड वडूजचे पो. कॉ. सागर सजगणे, पो. हवा. दत्तात्रय जाधव आणि प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे पो. हवालदार दिपक शेडगे, म. पो. हवालदार दडस, पो. कॉ. अक्षय शिंदे यांनी सहकार्य केले.









