प्रतिनिधी
बेळगाव
मुचंडी (ता. बेळगाव) येथील एका तरुणाचा खून करून अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे भासविण्यात आले आहे. या तरुणाचा मृत्यू अपघातात झाला नसून खून झाल्याचा संशय बळावल्यामुळे पोलिसांनी चौकशीची चपे फिरविली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
महेश महादेव अवणी (वय 28, रा. मुचंडी) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून तो विद्यार्थी होता. 10 ते 12 दिवसांनंतर हा प्रकार उघडकीस येत असून या घटनेने तपास अधिकारीही चक्रावून गेले आहेत. मारिहाळचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे.
24 जुलै रोजी रात्री मुचंडी-मुतगा रोडवर महेशचा मृतदेह आढळून आला होता. अज्ञात वाहनाने ठोकरल्याने त्याचा मृत्यू झाला आहे, अशी फिर्याद दुसऱया दिवशी मारिहाळ पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. अज्ञात वाहनाच्या ठोकरीने या तरुणाचा मृत्यू झाल्याचे पोलीस दरबारी नोंद करण्यात आले होते.
मात्र या तरुणाचा मृत्यू अपघाती झाला नसून त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मारिहाळ पोलिसांनी प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. अनगोळ परिसरात खून करून महेशचा मृतदेह मुचंडी-मुतगा रोडवर टाकून दिल्याची चर्चा सुरुवातीपासूनच सुरू होती.
हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या महेशला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी अपघातात जखमी झाल्याचे सांगून त्याच्यावर उपचारही सुरू करण्यात आले होते. प्रत्यक्षात त्याचा खून झाल्याचा संशय बळावला आहे. महेशच्या अंगावरील जखमा व घटनास्थळ यामध्ये ताळमेळ होत नसल्याने पोलिसांनाही संशय होता. या संशयावरून व स्थानिक माहितीवरून तपास हाती घेण्यात आला आहे.









