प्रतिनिधी / मिरज
कोरोनाच्या संकटानंतर सांगलीकरांना मुंबईचा प्रवास करण्यासाठी एक सुखद बातमी आहे. कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यासाठी सांगली स्थानकाला पूर्वी केवळ 76 स्लिपर कोच आरक्षण कोटा होता. आता त्यामध्ये 242 ने वाढ करून स्लीपर कोचसाठी 318 आरक्षण कोटा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांची सोय झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्राची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसची प्रवासी सेवा 1 फेब्रुवारीपासून पूर्ववत सुरू होत आहे. ही एक्स्प्रेस आता ‘स्पेशल एक्स्प्रेस’ म्हणून धावणार आहे. या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी सांगली स्थानकाला अत्यल्प आरक्षण कोटा असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांना निवेदन देऊन आरक्षण कोटा वाढवून देण्याची मागणी सांगली रेल डेव्हलपमेंट ग्रुपने केली होती.
प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन रेल्वे बोर्डाने सांगली स्थानकावरून महालक्ष्मी एक्सप्रेससाठी 318 स्लीपर कोच, २५८ बर्थसीट, याशिवाय एसी ३ टियर प्रथम श्रेणी 48 आणि द्वितीय श्रेणीसाठी 13 असा दिवसभराचा आरक्षण कोटा उपलब्ध करून दिला आहे. विशेष बाब म्हणजे रेल्वे बोर्डाने स्लीपर कोच बोगीतील आसनक्षमता 242 ने वाढवून दिल्याने सांगली ते मुंबई प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांची चांगली सोय झाली आहे.








