-महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या मागणी प्रमाणे पावणे दोन महिन्याचे वेतन मिळणार
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला आर्थिक मदत व एस.टी. कर्मचा-याचे वेतन यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन मंत्री अनिल परब व परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या समवेत आज ४ ऑगस्ट, २०२० रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत एस.टी. कर्मचा-यांच्या वेतनाकरीता ५५० कोटी रूपयांचा निधी सवलत मुल्यांचा प्रतिपूर्तीपोटी अग्रीम म्हणून दिलेले आहेत. सदर रकमेतून एसटी कर्मचा-यांचे माहे मार्च महिन्याचे २५%, मे महिन्याचे ५०% व जून महिन्याचे संपूर्ण वेतन देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.
परंतू भारतीय स्टेट बँक या बँकेत खाते आहे अशा कर्मचा-यांचे वेतन (CMP) प्रणालीव्दारे आज त्यांच्या खात्यात जमा होतील. ज्या विभागातील वेतनाबाबत पूर्ण तयारी नसल्यास अथवा त्यांच्याकडे तांत्रिक अडचणी असल्यास अशा विभागाचे उद्या किंवा सोमवारपर्यंत पगार होणार आहेत. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँक लि., मुंबई या बँकेत पगार खाते असतील अशा कर्मचा-यांचे वेतन सोमवारी होतील.
एस.टी. कर्मचा-यांचे शासन निर्णयानुसार माहे मार्च महिन्याचे ७५ टक्के वेतन दिलेले होते. परंतु संदर्भ क्र. ४ अन्वये महाराष्ट्र शासनाने माहे मार्च २०२० चे उर्वरीत वेतन दुस-या टप्प्यात प्रदान करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार माहे मार्च २०२० चे उर्वरीत २५ टक्के वेतन व माहे मे महिन्याचे वेतन ५० टक्के देणे बाकी आहे. तसेच जून महिन्याचे वेतन अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्मचा-यांच्या मुलभूत गरजा भागविणे अशक्य झालेले आहे. महाराष्ट्र शासनाने एस.टी. कर्मचा-यांच्या वेतनाकरीता ५५० कोटी रूपये मंजुर केलेले आहेत सदर रकमेतून कर्मचा-यांच्या वेतनाशीवाय इतरत्र खर्च करण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली होती.
एसटी प्रशासनाने माहे मार्च महिन्याचे उर्वरीत २५ टक्के वेतन तसेच मे महिन्याचे ५० टक्के वेतन यासह जून महिन्याचे १०० टक्के वेतन एस.टी. कर्मचा-यांना देण्यासंदर्भात आदेश प्रसारित केले असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.
Previous Articleगिरीश मुर्मू यांनी स्विकारला कैगचे महालेखाकर म्हणून कार्यभार
Next Article रत्नागिरी तालुका ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट









