ऑनलाईन टीम/तरुण भारत
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गुरुग्राममध्ये खुल्या जागेवर नमाज पठण केलेलं खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. गुरुग्रामच्या सेक्टर ३७ मधील मोकळ्या जागेत शुक्रवारच्या नमाज अदा करण्यावर अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर मनोहर लाल खट्टर यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. दरम्यान “नमाज पठण करण्यासाठी काही खुल्या जागा राखीव ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय मागे घेण्यात आला असून राज्य सरकार या समस्येवर लवकरच तोडगा काढेल,” असं खट्टर म्हणाले.
मुख्यमंत्री खट्टर यांनी एका सरकारी कार्यक्रमामध्ये हे विधान केलं आहे. खट्टर यांनी, “त्यांना किंवा सरकारला यापासून कोणाचीही अडचण नाही. प्रत्येकाला आपल्या देवाची पूजा करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे, मात्र प्रत्येकाने मर्यादेत राहून हे कार्य केले पाहिजे. मुस्लिमांनी मशिदीत जाऊन नमाज अदा करावी, दर आठवड्याला मोकळ्या मैदानात एकत्र येणे चुकीचे आहे. सरकार हे होऊ देणार नाही.” असा इशारा त्यावेळी खट्टर यांनी दिला आहे.









