दीपनगर-कुर्टी येथील घटना : 10 वर्षाचा सक्त मजूरीची शिक्षा, रू. 20 हजार दंड : तपास अधिकारी उपनिरीक्षक नितीन हळर्णकर : सरकारी वकील सत्यावन राऊत देसाई
प्रतिनिधी / फोंडा

खुनीहल्लाप्रकरणी आरोपपत्र दाखल केलेल्या संशयिताला पणजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या फोंडा न्यायालयातर्फे अतिरीक्त सत्र न्यायाधीश बेला नाईक यांनी सबळ पुराव्यानिशी दोषी ठरवून 10 वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच रू. 20 हजारांचा दंड, दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला 2 वर्षाचा अधिक सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. अनिश उर्फ अखिलेंद्र कुमारसिंग ठाकूर (28,मुळ उ.प्रदेश रा. कोपरवाडा कुर्टी) असे त्याचे नाव आहे. सदर घटना तीन वर्षापुर्वी शुक्रवार 17 नोव्हे 2017 रोजी सायंकाळी घडली होती. याप्रकरणी संशयिताला दोषी ठरविण्यात आले असून शिक्षेची सुनावणी काल 17 जून रोजी न्या. बेला नाईक यांनी सुनावली.
कोपरवाडा कुर्टी-फोंडा येथे एक युवक लालबहादूर रामराज (35, मुळ. उ.प्रदेश सध्या रा. कोपरवाडा कुर्टी) हा आपला मित्र आरोपी अनिश उर्फ अखिलेंदकुमारसिंग ठाकूर यांच्यासह कोपरवाडा कुर्टी येथे एकाच भाडय़ाच्या खोलीत राहत होता. दोघेही सेंटरेगच्या कामासाठी रोजंदारीवर कामाला होते. क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात अखिलेंद्रने लालबहादूलवर लाकडी स्टूलने प्रहार केले होते. त्यात तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला त्याच अत्यवस्थेत सोडून अखिलेंद्र फरार झाला होता. याप्रकरणी लालबहादूर यांचा भाऊ मंथूराम (40, रा. दिपनगर कुर्टी) यांने सदर घटनेची तक्रार फोंडा पालिसांत नोंद केली होती. संशयिताविरोधात भां.द.स. 307 कलमाखाली गुन्हा नोंदवून पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. याप्रकरणी तपास अधिकारी म्हणून उपनिरीक्षक नितीन हळर्णकर यांनी काम पाहिले. त्यावेळी फोंडय़ाचे निरीक्षक हरीष मडकईकर व उपअधिक्षक महेश गावकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

संशयिताला केले होते मंगळूर येथून गजाआड
याप्रकरणी फोंडा पोलिसांनी अथक परिश्रम घेत संशयिताला 23 नोव्हे. 2017 रोजी मंगळूर येथून अटक केली होती. आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्याअनुसरून झालेल्या युक्तीवादात पिडीत युवकातर्फे सरकारी वकील सत्यवान राऊत देसाई यांनी बाजू मांडली. तपास अधिकारी नितीन हळर्णकर व सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर पुरेशे पुरावे सादर केले. सुमारे 12 जणांच्या जबानी नोंद करण्यात आल्या. त्यानुसार न्यायाधीशांनी सबळ पुराव्यानिशी संशयिताला दोषी ठरवून 10 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनाली आहे.









