प्रतिनिधी/ सातारा
पॉवर हाऊस परिसरात शनिवारी रात्री खुनाच्या घटनेनंतर बोगदा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामध्ये बबन गोखले यांच्या खुनात संशयित मारेकरी शुभम जयराम कदम याला पोलिसांनी अटक केली. मात्र, त्याने गोखले यांना जीवे मारल्याचा राग मनात धरुन शुभमचा भाऊ वैभव जयराम कदम वय 24 रा. पॉवर हाऊस, मंगळवार पेठ, सातारा याला घरात घुसून बाहेर काढत मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार वैभव कदम हा गोखले यांच्या खुनातील आरोपी शुभम कदमचा भाऊ आहे. शुभमने गोखले यांना जीवे मारल्याचा राग मनात धरुन दि. 19 रोजी दुपारी 11.30 च्या दरम्यान पिल्या नलवडे, रवि गोखले व त्यांच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी मुले सर्व (रा. बोगदा, मंगळवार पेठ, सातारा) यांनी शुभमच्या घरावर चाल केली.
यावेळी घरात झोपलेला शुभमचा भाऊ वैभव याला ओढत ओढत घराच्या बाहेर आणून पिल्या नलवडे याने पट्टय़ाने मारहाण केली तर रवि गोखले याने काठीने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीमुळे वैभव जखमी झालेला असताना अनोळखी दोन मुलांनी वैभवला पाठीवर, तोंडावर मारहाण केल्याची तक्रार वैभव कदम याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.
दरम्यान, या घटनेमुळे बोगदा व पॉवर हाऊस परिसरात तणाव निर्माण झाला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत तिथे गर्दीला पांगवले. वैभवला मारहाण करणारे तेथून पळून गेले होते. दिवसभर या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या गुह्याचा तपास पोलीस हवालदार माने करत आहेत.








