प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
खुनासारखा गंभीर गुन्हा दाखल असलेल्या ग्रामपंचायत सदस्यावर प्रशासकीय कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ येत्या 26 जानेवारीपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दाभोलीतील काही ग्रामस्थांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना दिला आहे. 40 ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन त्यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, दाभोली ग्रामपंचायत क्षेत्रातील मोबारवाडी येथील भानुदास सुदाम मोर्जे यांच्या मिळकतीमधील जमीन धाकदपटशाहीच्या मार्गाने व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती आणून बळकावण्याच्या इराद्याने 28 फेब्रुवारी 2019 रोजी गावचा उपसरपंच तथा सदस्य संदीप शशिकांत पाटील याने शिवीगाळ करीत भानुदास मोर्जे यांना ठार मारल्याप्रकरणी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल होऊन न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता त्याची जामिनावर मुक्तता झाली असून तो गावात व ग्रामपंचायत कार्यालयात उघडपणे फिरत आहे. खरं तर मनुष्यवधासारखा अतिगंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल असताना अशा व्यक्तीस पदावरून निलंबित केले जाते. परंतु, सदर व्यक्ती एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता त्याला अभय देण्यात आले आहे. अशा प्रवृत्तीच्या माणसापासून आम्हा ग्रामस्थांना मोठा धोका असून आठ दिवसांच्या आत त्याचे निलंबन न केल्यास ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयानुसार 26 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.









