प्रतिनिधी / सातारा :
मराठा आरक्षणाचा राज्य आणि केंद्र सरकारने जो खेळ लावला आहे. त्यावरुन खासदार युवराज छत्रपती संभाराजे यांनी काल आपले आक्रमकपणे मत व्यक्त केले. ते दि. 27 रोजी पुढच्या ध्येयधोरणाबाबत स्पष्ट भूमिका मांडणार आहेत. त्याच अनुषंगाने आज सकाळी 11 वाजता राजधानी साताऱ्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयांची भेट घेवून त्यांच्याशी सुमारे पाऊण तास त्यांनी चर्चा केली. राजधानीतील मराठा कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली.
मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रश्न भिजत पडलेला आहे. विधानसभा निवडणूका लागण्यापूर्वी मराठा आरक्षणावरुन वाद चिघळतो अन् निवडणूका झाल्या की तो क्षमतो. आण्णासाहेब पाटील यांनीही लढा दिला. आजपर्यंत अनेक आयोग आले, मात्र आरक्षण तेथेच राहिले. 2016 मध्ये कोपर्डीतील श्रद्धाच्या घटनेनंतर अवघा मराठा समाज पेटून उठला. राज्यभरात 56 मुक मोर्चे निघाले. 42 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मात्र, न्यायालयाने आरक्षणाला रेड सिग्नल दिला अन् पुन्हा मराठा आरक्षणाची ठिणगी गावोगावी पेटू लागली आहे.
मराठा आरक्षण नसल्याने चांगले शिक्षण घेता येईना, चांगले शिक्षण नसल्याने चांगली नोकरी मिळत नाही. चांगली नोकरी नसल्याने विवाह होत नाही. तर मुलींच्या शिक्षणासाठी घरातील जमीन विकून शिक्षण देणाऱ्या पालकांना पुढे मुलीला नोकरी मिळेना अशी अवस्था आहे. शेतीचे तुकडीकरण झाल्याने पूर्वीसारखा मराठा समाज आज बिकट अवस्थेत आहे. मराठा समाजाला आरक्षण गरजेचे आहे. यासाठी वारंवार उठाव झाला आहे. सध्या सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरक्षणासाठी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे आपली भूमिका दि.27 रोजी जाहीर करणार आहेत. गुरुवारी त्यांनी सातारा शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी भेट घेतली. ही भेट सकाळी 11 वाजता झाली. यावेळी राज्य समन्वयक विवेकानंद बाबर, बंडू कदम, उमेश शिर्के, संदीप नवगणे आदी कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली.