प्रतिनिधी / सोलापूर
अक्कलकोटमध्ये भाजप, संघ परिवार व समविचारी संघटनांतर्फे शनिवारी अक्कलकोटमध्ये नागरिकत्त्व सुधारणा व नोंदणी कायद्याच्या समर्थनार्थ भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी सहभागी झाले होते. या रॅली दरम्यान त्यांचे भाषण झाल्यानंतर अचानक त्यांना भोवळ आली. त्यानंतर तत्काळ त्यांना सोलापुरातील अश्विनी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीकांत माळगे यांनी सांगितले.
अक्कलकोटमध्ये नागरिकता सुधारणाच्या समर्थनार्थ भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजी यांनी सहभाग नोंदवला होता. त्यानंतर पदयात्रेच्या समारोपाप्रसंगी खासदार महास्वामीजी यांचे भाषण झाले. त्यानंतर अचानक त्यांना भोवळ आली आणि तातडीने त्यांना सोलापुरातील अश्विनी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सर्व तपासण्या झाल्या असून, खासदारांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. भाजपच्या पदाधिकाऱयांनी महास्वामीजींना भेटण्यासाठी रुग्णालयात गर्दी केली होती. माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांचे चिंरजीव नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांनी भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली.
दौरे, उन्हात रॅली, भाषण, अवेळी जेवणामुळे त्रास
खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजींचे दौरे सुरूच होते आणि आज शनिवारी रॅलीमध्ये सहभाग घेतला. उन्हात फिरले. सभाही उन्हात झाली. यासह वेळेवर जेवण नसल्यामुळे त्यांना चक्कर आल्याचे त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीकांत माळगे यांनी सांगितले.