प्रतिनिधी / सातारा :
सातारा विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक बदल करण्यात आले. शहराच्या गरजा ओळखून विकासकामांचे आराखडे तयार करून त्यावर अंमलबजावणी करण्यात आली. सातारा विकास आघाडीचे नेते, विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा विकास आघाडीने गरूड झेप घेतली आहे. बदलत्या साताऱ्याला मल्टीपर्पज हॉलची गरज होती, ती ओळखून पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी त्यांच्या प्रभागात नगरपालिकेच्या माध्यमातून त्याची पूर्तता असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केले.
प्रभाग क्र 1 मधील मागासवर्गीय कर्मवीर सोसायटी येथे सातारा नगरपालिकेच्या माध्यमातुन पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांच्या संकल्पनेतुन व माजी उपनगराध्यक्ष राजू भोसले यांच्या सहकार्याने सुमारे 65 लाख रुपयांचा दोन मजली मल्टीपर्पज हॉल उभारण्यात येत आहे. त्या कामाच्या पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे पुजन माधवी कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
माधवी कदम पुढे म्हणाल्या, विकासाची दर्जेदार व सातारकरांच्या हिताची कामे करण्यामध्ये सातारा नगरपालिका कोठेही कमी पडणार नाही. विकास कामांचा आलेख सतत उंचावतच राहणार आहे. गेल्या दोन वर्षापासून शहरात मोठय़ा प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे नगरपालिकेला विकासकामे करण्यात काही मर्यादा आल्या. राज्य व जिल्हा प्रशासनाने घातलेल्या काही अटी व मर्यादेत राहून नगरपालिकेला काम करणे भाग होते. मात्र सध्या परिस्थिती बदलत असल्यामुळे प्रशासनाने घातलेल्या अटी शिथिल केल्यामुळे सातारा शहरात पुन्हा एकदा विकासाचे वारे मोठय़ा प्रमाणावर वाहत आहे.
यावेळी सीता हादगे, माजी शिक्षण सभापती राम हादगे, सुवर्णकार समाजाचे जिल्हा अध्यक्ष संजय पोतदार, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पोळ, कुमार पवार आदी उपस्थित होते.