प्रतिनिधी / बेळगाव
खासबाग, टीचर्स कॉलनी येथील खुली जागा व रस्ते मनपाकडे हस्तांतर करण्यात आले होते. त्यामुळे तारेचे कुंपण घालून खुली जागा असा फलक मनपाने लावला होता. पण सदर फलक हटवून शेजारच्या जागा मालकाने अतिक्रमण केल्याची तक्रार टीचर्स कॉलनी हौसिंग सोसायटीच्यावतीने मनपा आयुक्त जगदीश के. एच. यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
टीचर्स कॉलनी हौसिंग सोसायटीची स्थापना 1989 ला करून खासबाग येथे टीचर्स कॉलनी ही अधिकृत वसाहत निर्माण केली आहे. सदर वसाहत बुडाच्या नियमावलीनुसार एनए लेआऊट करून खुली जागा व सार्वजनिक वापरासाठी काही जागा राखून ठेवल्या होत्या. विकासासाठी सदर जागा मनपाकडे हस्तांतर केल्या होत्या. त्यामुळे जागेभोवती तारेचे कुंपण घालून मनपाने खुली जागा असा फलक लावला होता. या ठिकाणी दत्त मंदिर आणि ध्वजस्तंभ उभारण्यात आला होता. पण शेजारी असलेल्या जागा मालकाने मनपाचा फलक, ध्वजस्तंभ व तारेचे कुंपण हटवून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सदर जागेची पाहणी करून मनपाने खुल्या जागेला तारेचे कुंपण घालावे व विकास करावा, अशा मागणीचे निवेदन टीचर्स कॉलनी हौसिंग सोसायटीच्यावतीने महापालिका आयुक्तांना देण्यात आले. सदर निवेदन देताना कॉलनीचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, उपाध्यक्ष वाय एम. सुळेभावी, कार्यदर्शी एस. एन. तावरे, एस. एच. मदलूर, एस. एस. खेमलापुरे, के. सी. मुंडा उपस्थित होते.









