प्रतिनिधी/ बेळगाव
बॅ. नाथ पै चौकाला जोडणाऱया खासबाग ते जुने बेळगावपर्यंतच्या रस्त्याचा विकास करण्याची घोषणा महापालिकेने केली होती. मात्र या रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर खड्डे निर्माण झाले असल्याने खड्डेमय रस्त्यावरूनच वाहनधारकांना ये-जा करावी लागत आहे. तसेच याचा फटका स्थानिक रहिवाशांनादेखील बसत आहे.
जुने बेळगाव ते खासबाग येथील बसवेश्वर चौक आणि बॅ. नाथ पै चौकाला जोडणारा रस्ता वाहनधारकांसाठी सोयीचा आहे. राष्ट्रीय महामार्गाने येणाऱया वाहनधारकांना वडगाव, शहापूर, टिळकवाडी, अशा विविध भागात जाण्यासाठी हा रस्ता खूपच जवळचा आहे. त्यामुळे या रस्त्याचा वापर सर्व वाहनधारक करीत असतात. जुने बेळगाव परिसरातून जोडणारे रस्ते आहेत. मात्र हा रस्ता खूपच सोयीचा असल्याने वाहनधारक या रस्त्यावरूनच ये-जा करीत असतात. वाहनधारकांच्या सोयीचा रस्ता असल्याने या रस्त्याचा विकास करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केला होता.
खासबाग, संभाजी रोडच्या रुंदीकरणावेळी या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार अतिक्रमणे हटवून घेण्याची सूचना देखील मालमत्ताधारकांना करण्यात आली होती. मात्र रस्त्याचे केवळ डांबरीकरण करून दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र अलिकडे वाहनांची संख्या वाढली असून रस्त्यावर वाहनांची घरघर नेहमी असते. त्यामुळे या रस्त्याचा विकास करणे गरजेचे आहे. सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली असून संपूर्ण रस्त्यावर मोठ मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्डेमय रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांची गैरसोय होत आहे. अशातच या खड्डय़ांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने समस्येमध्ये आणखीनच भर पडली आहे.
रस्त्याची दुरवस्था झाल्याने याचा फटका परिसरातील रहिवाशांना देखील बसत आहे. वाहनधारक खड्डे चुकविण्याच्या प्रयत्न करीत असल्याने अपघात घडत आहेत. तसेच खड्डय़ांतील पावसाचे पाणी वाहनांमुळे घरांच्या पायऱयांवर व नागरिकांच्या अंगावर उडत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.









