प्रतिनिधी / कोल्हापूर
ऐतिहासिक खासबाग मैदान परिसरातील खाऊ गल्लीतील विनापरवाना 35 हून अधिक हातगाडय़ा आणि केबिन्स महापालिकेने सोमवारी जप्त केल्या. नागरिकांच्या तक्रारीनंतर जागे झालेल्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली.कारवाईवेळी काही काळ तणावही निर्माण झाला होता. यावेळी इतर व्यावसायिकांच्या परवान्यासंदर्भातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱया खासबाग मैदान परिसरामध्ये केशवराव भोसले नाटय़गृह, राजारामियन क्लबसह प्रायव्हेट हायस्कूल, संघवी विद्यामंदिर, अहिल्या होळकर विद्यालय आदी शाळा आहेत. त्याचबरोबर बालगोपाल तालमीजवळ केएमटीचा थांबाही आहे. बिंदू चौक, उद्यमनगर पासून कळंबा परिसरातील जाणारी वाहने, त्याचबरोबर उपनगरातून शहरात येणारी वाहने या खासबाग परिसरातून जात असतात. त्यामुळे या परिसरात वाहनांची नेहमीच गर्दी होत असते. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळीही वाहतूक कोंडी नित्याचीच बनलेली आहे. खाऊ गल्लीत असणाऱया परवानाधारक फेरीवाल्याच्या हातगाडय़ा अथवा केबिन्सऐवजी इतर काही विनापरवाना व्यावसायिकांनी गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण करत आपली केबिन्स, हातगाडय़ा लावून व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे परिसरात नागरिकांसह विद्यार्थ्यांबाबतही दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करत नागरिकांनी केबिन्स आणि हातगाडय़ा हटविण्याची म्अतिक्रमण विभागाकडे व आयुक्त यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत, महापालिका प्रशासनाने सोमवारी कारवाई केली. विनापरवाना केबीन्स आणि हातगाडय़ा केवळ हटविल्या नाहीत तर त्या जप्तही केल्या.
सोमवारी सायंकाळी या कारवाईला प्रारंभ झाला. प्रारंभी खाऊ गल्लीमध्ये असलेल्या विविध व्यावसायिक, विक्रेत्यांचे परवाने तपासण्यात आले. त्यानंतर अनधिकृत केबीन्स व हातगाडय़ा यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली. अनेकांनी कारवाईदरम्यान वाद घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना योग्य ती कायदेशीर समज देण्यात आली. यावेळी इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, कनिष्ठ अभियंता निवास पोवार, सागर शिंदे, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पंडीत पोवार यांच्यासह इस्टेट विभागाचे सयाजी कुंभार, नितीन चौगुले, कलंदर देसाई, मलिक भोसले, विष्णू चीत्रुक, महादेव गणेशाचार्य यांनी या कारवाईत भाग घेतला.
62 केबीन्स, हातगाडय़ा अधिकृत
खासबाग परिसरात 150 केबिन्स, हातगाडय़ा आहेत. त्यातील 62 केबिन्स, हातगाडय़ा अधिकृत आहेत. तर उर्वरीत अनधिकृत असल्याचे सांगण्यात आले. उर्वरीतपैकी 35 केबिन्स, हातगाडय़ावर कारवाई झाली आहे. कागदपत्र तपासणीत अनधिकृत असणाऱयांवर कारवाई केली जाणार असल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
स्थानिक राजकीय नेत्यांना झटका
खाऊ गल्लीत हातगाडी लाव, केबिन लाव, व्यवसाय कर, मी आहे, असे सांगत विनापरवाना केबिन्सधारकांना आपल्या राजकीय ताकदीच्या जोरावर ‘अर्थपूर्ण’ आधार देणाऱया स्थानिक राजकीय नेत्यांना अतिक्रमणच्या या अचानक आणि झटपट कारवाईने झटका बसल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.









