प्रतिनिधी / कोल्हापूर
खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी कोरोनाची लस टोचून घेतली. नवी दिल्लीतील कोरोना लसिकरण सेंटरमध्ये आपण टोचून घेतल्याची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. कोरोनाची लस सुरक्षित असून ती सर्व नागरिकांनी लस टोचून घ्यावी, असे आवाहनही संभाजीराजे यांनी केले आहे.
राज्यात तसेच देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढले आहे. त्यात दुसरीकडे लसीकरण मोहीम सुद्धा युद्धपातळीवर सुरु आहे. सध्या देशात दुसऱया टप्यातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरवात झालेली आहे. या अंतर्गत 65 वर्षावरील जेष्ठ व्यक्तींना लस टोचण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. आता त्या पाठोपाठ खासदार छत्रपती संभाजीराजेंनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. तसेच लस सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
लस घ्या, नियमांचेही पालन करा
कोरोनाच्या लसीबद्दल आजही अनेक लोकांच्या मनात काही गैरसमज असल्याचे दिसून येते, परंतु ही लस अतिशय सुरक्षित असून सर्वांनी लस घ्यावी ही कळकळीची विनंती आहे. लसीकरणानंतरही मास्क वापरणे, सामाजिक अंतर व हातांची स्वच्छता राखणे यांसारख्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन आपल्या सर्वांना करावे लागणार आहे, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.









