मुंबई/प्रतिनिधी
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हा पासून राणे आणि भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका करत आहेत. यासर्व टीकेला संजय राऊत प्रतिउत्तर देत आहेत. त्यामुळे राणे-शिवसेना वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या घर आणि कार्यालयाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. तर डीसीपी प्रशांत कदम संजय राऊत यांच्या भेटीला गेल्याची देखील माहिती समोर येत आहे. ‘एका मराठी’ वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. दरम्यान, भाजप नेते नितेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आणि राणे-सेना वादानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
नारायण राणे आणि संजय राऊत हे आपल्या आक्रमक शैलीमुळे नेहमी चर्चेत असतात. राणेंनी शिवसेना सोडल्यापासून राणे-शिवसेना वाद सुरु आहे. त्यातच वादाला आणखीन भर म्हणजे राणेंनी जन आशीर्वाद यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यांनतर नाशिक पोलिसांनी गुन्हा नोंद करत नारायण राणेंच्या अटकेचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार राणे यांना संगमेश्वर येथे अटक करण्यात आली होती. त्यांनतर त्यांना महाडमधील कोर्टात हजर करण्यात आलं असता त्यांना जमीन मंजूर करण्यात आला. त्यांनतर राणे आणि शिवसेना त्यांच्यामध्ये टीका करण्याचे सत्र सुरुच आहे.








