संपर्कात आलेल्यांना टेस्ट करण्याचे केले आव्हान
प्रतिनिधी / कोल्हापूर
हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षाची नेतेमंडळी गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रचारात असताना खासदार धैर्यशील माने हे हातकणंगले लोकसभा मतदार संघातील गावोगावी जाऊन कोरोना बाबत आढावा बैठका घेवुन जनतेशी संवाद साधने व कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रशासनासोबत योग्य ते नियोजन करण्यात व्यस्त होते. दरम्यान,त्यांना गेले दोन दिवस ताप होता.खबरदारी म्हणून त्यांनी कोरोना चाचणी केली होती. बुधवार (ता.19)रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सोशल मिडीयावर संदेश व्हायरल
गेल्या दोन तीन दिवसांपासून कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने बुधवारी मी कोव्हिड चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू केले आहेत.माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी त्यांची तत्काळ टेस्ट करून घ्यावी आणि दक्षता घ्यावी. तसेच कोणतीही मदत लागल्यास माझी संपूर्ण टीम आपल्या सेवेमध्ये तत्पर आहे. लवकरच मी आपल्या सेवेमध्ये पुन्हा रुजू होईन. तरी सर्वांनी आपली आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी,असे आवाहन त्यांनी केले आहे.








