प्रतिनिधी/ खेड
रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे हे दापोली विधानसभा मतदार संघात विविध शासकीय कार्यक्रमादरम्यान डावलत असून स्थानिक आमदार म्हणून आपल्या हक्कावर गदा आणण्याचे काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरोधात विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, खासदार तटकरे स्थानिक आमदार म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारचे निमंत्रण न देताच अधिकाऱयांसमवेत शासकीय बैठका घेत आहेत. 12 ऑक्टोबर रोजी घेतलेल्या आढावा बैठकीचे कुठलेच निमंत्रण दिलेले नाही. मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथील आंबेत पूल कमकुवत झाल्याने जड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे सातत्याने निधीसाठी प्रयत्न केल्यानंतर संबंधित अधिकाऱयांसमवेत बैठकाही घेतल्या. शासनाकडून जेटी बांधण्यासाठी निधीही मंजूर झाला. मात्र कार्यारंभ आदेश येण्यापूर्वीच खासदार तटकरे यांनी 11 ऑक्टोबर रोजी आमदार अनिकेत तटकरे व माजी आमदारांना घेऊन भूमिपूजन केले. शासनाचा निधी म्हणजे खासगी मालमत्ता आहे, असे समजून खासदार तटकरे यांनी स्थानिक आमदार असतानाही कुठल्याही प्रकारचे निमंत्रण दिले नाही.
भूमिपूजनाच्या पाटीवरही माझे नाव न टाकता खासदार तटकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाचाच कार्यक्रम समजून भूमिपूजन केले. खासदार तटकरे यांनी जाणीवपूर्वक निमंत्रण देण्याचे टाळून राजकारण करत आपल्या हक्कावर गदा आणण्याचे काम ते करत आहेत. याचमुळे विधानसभा अध्यक्ष पटोळे यांच्याकडे 20 ऑक्टोबर रोजी खासदार तटकरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करून योग्य कारवाई करण्याची विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.