सातारा / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या सातारची भूमी ही शहिदांची भूमी आहे. हाच वारसा पुढे नेण्यासाठी देशांतील सर्वात मोठ्या संख्येने लष्करी सेवेचा वारसा जपणाऱ्या गावांपैकी सातारा जिल्ह्यातील अनेक गावांनी शेकडो जवान देशसेवेसाठी राष्ट्राला अर्पण केले आहेत. याच सातारच्या भूमीवर लष्कराचे आधुनिक प्रशिक्षण देणारी लष्कराची छावणी उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारणे शक्य आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली येथे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांची खासदार उदयनराजे यांनी भेट घेतली. यावेळी उदयनराजे यांनी लष्करप्रमुख नरवणे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा खास भेट म्हणून दिली.
सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा असून जिल्ह्यातील अनेक जवानांनी देशासाठी बलिदान दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात लष्कराचे आधुनिक प्रशिक्षण देणारी छावणी उभारण्यात आली तर ती जवानांच्या शौर्याच्या शिरपेचात मानाचा तुरा असेल. ही छावणी जिल्ह्यातील तरुणांना प्रेरणा देणारी असेल. लष्कराच्या छावणीला पोषक असे वातावरण आणि सुविधा असल्यामुळे लष्कराकडून याचा नक्की विचार केला जाईल अशी आशा आहे.
लष्करी छावणीसाठी तसेच आधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा ह्या सातारची भूमीत आयत्या आहेत. विमानतळ, रेल्वे स्टेशन, राष्ट्रीय महामार्गासह रस्त्याचे जाळे, मुबलक जमीन आणि पाणी यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सैनिकांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक गड किल्ले हे सुद्धा प्रेरणादायी आहेत. तसेच लष्करी छावणीला आवश्यक असणारी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही.
सैनिकांच्या या जिल्ह्यात छावणी उभारली गेली तर ती नव्या पिढीला प्रेरणादायी असेल. तसेच ती अभिमानाची गोष्ट असेल. या छावणीच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जतन करता येईल. तसेच या छावणीमुळे जिल्ह्यातील तरुणांना आणि शेतकऱ्यांना व्यवसाय अथवा रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. ही छावणी सातारच्या वैभवात मोठी भर घालेल, असे उदयनराजे यांनी सांगितले.









